मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये माजी सैनिकांचा मेळावा
बाराशेहून अधिक माजी सैनिकांची उपस्थिती : पेन्शन, वैद्यकीय सेवांच्या तक्रारींचे केले निवारण
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रविवारी दक्षिण विभागीय माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाराशेहून अधिक माजी सैनिक, वीर नारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. माजी सैनिकांची पेन्शन, वैद्यकीय उपचार, बँकिंग यासह इतर तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्या. या कार्यक्रमाला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते.
शिवाजी स्टेडियम येथे रविवारी सकाळपासून मराठा रेकॉर्ड विभागाच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगावसह विजापूर, बागलकोट, हुबळी, धारवाड, कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये केवळ मराठा इन्फंट्रीच नाही तर इन्फंट्रीचेही रेकॉर्ड रुम उपलब्ध करण्यात आले होते. याबरोबरच दंततपासणी तसेच केएलईचे आरोग्य तपासणी यांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
माजी सैनिकांना मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले, माजी सैनिकांना बळकटी देण्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे. प्रोजेक्ट नमन अंतर्गत माजी सैनिकांना पासपोर्ट, विमान तिकीट, रेल्वे तिकीट, रेशनकार्ड, पॅनकार्ड यासह इतर सर्व सुविधा एकाच ठिकाणी दिल्या जाणार आहेत. चौदा राष्ट्रीयकृत बँकांसोबत समन्वय करार असून या ठिकाणी कँटीन तसेच ईसीएचएस याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सैनिकांसाठी उपलब्ध असलेले मद्य बाहेर खुल्या बाजारात विक्री केले जात असल्याची तक्रार पोलिसांकडून इन्फंट्रीकडे येत आहे. त्यामुळे जवानाने अथवा माजी सैनिकाने मद्य बाहेर विक्री करू नये. आपल्याला मद्य नको असेल तर त्यांनी ते कँटीनमधून घेऊच नये. याबरोबर माजी सैनिकांसाठी 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचेही सांगितले. लेफ्टनंट कर्नल अनिलकुमार यांनी आभार मानले. यावेळी लेफ्टनंट कर्नल हबीब यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.