शहरात कचरा समस्या गंभीर
उचल करण्याकडे दुर्लक्ष, दिवाळी सणानंतर कचऱ्यात वाढ
बेळगाव : शहरातील कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याने कचरा समस्या गंभीर बनू लागली आहे. सणासुदीच्या काळात कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र वेळेत उचल होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरू लागले आहे. दिवसेंदिवस शहराच्या कचऱ्यातही वाढ होत आहे. त्यामुळे शहरासह इतर विविध रस्त्यांवर कचरा पडून असल्याचे दिसत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह रामलिंग खिंड गल्लीत कित्येक दिवसांपासून कचरा जागेवर पडून आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बाजारपेठेसह नागरी वस्तीचा विस्तार वाढू लागला आहे. त्याप्रमाणात कचराही वाढू लागला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. नुकताच दिवाळी सण साजरा करण्यात आला आहे. दरम्यान सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमही झाले. लक्ष्मीपूजन आणि इतर कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. शहरात ऊस आणि केळ्यांच्या झाडांची आवकही वाढली होती. सणानंतर यामुळे कचरा वाढला आहे.