कचरा ‘कुंडी’त ऐवजी ‘बाहेर’च...
भूमीगत कचरापुंडीचा वापर शून्य
बेळगाव : शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आरपीडी चौक परिसरात बसविण्यात आलेल्या भूमिगत कचराकुंडीत कचरा टाकण्याऐवजी कचरा पुंडीच्या परिसरात तो फेकला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचा ढीग दिसून येत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वेळच्या वेळी कचऱ्याची उचल केली जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गोवावेस ते आरपीडी कॉर्नर या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी भूमिगत कचराकुंडी बसविण्यात आली. परंतु नागरिकांकडून या कचराकुंडीत कचरा टाकण्याऐवजी कचरा कुंडीच्या भोवताली वाहनातून ये-जा करताना कचरा फेकला जात आहे. हॉटेलमधील शिळे अन्नपदार्थ, घरातील कचरा, प्लास्टिक टाकले जात असल्याने विद्रुपीकरण होत आहे. या परिसरात अनेक सार्वजनिक तसेच खासगी कार्यालये असल्यामुळे त्या सर्वांना कचऱ्यांच्या दुर्गंधीचा फटका बसत आहे. तसेच भटक्या कुत्र्यांकडून कचरा रस्त्याभर पसरला जात आहे. त्यामुळे वेळेत कचऱ्याची उचल करण्याची मागणी केली जात आहे.