प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग
समर्थनगरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
बेळगाव : समर्थनगर प्रवेशद्वारानजीकच नेहमीच कचऱ्याचा ढिगारा साचलेला असतो. आधीच रस्ता अरुंद आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग टाकले जात असल्याने ये-जा करणेही अवघड होत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरत असून, रेणुका मंदिरात येणाऱ्या भाविकांना याचा नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने या ठिकाणचे कचऱ्याचे ढिगारे त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. शहराला लागूनच असलेल्या समर्थनगरमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नागरी समस्या जैसे थे आहेत. रेणुका मंदिराच्या मागील बाजूला मुख्य प्रवेशद्वारानजीक कायम कचरा फेकला जातो. बऱ्याच वेळा वेळेत कचऱ्याची उचल होत नसल्याने त्या ठिकाणीच आग लावली जाते. समर्थनगर मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या कचऱ्यातूनच वाट काढत नागरिकांना घर गाठावे लागते. समर्थनगरची व्याप्ती दिवसागणिक वाढत असताना रस्त्यांची मात्र दुरवस्था झाली आहे. ना गटारींची सोय, ना रस्त्याची. पावसाच्या दिवसात पाणी निचरा होण्यास जागा उपलब्ध नसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरत असते. त्यामुळे महापालिकेने या सर्व समस्यांचा विचार करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.