उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलच्या समोर कचऱ्याचे साम्राज्य
दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना रोगराई होण्याची भीती; मुलांचे भविष्य धोक्यात
बेळगाव : उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलच्या समोर दररोज सकाळी कचऱ्याचे ढीग साचल्याने शाळेला येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शाळेसमोर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून त्यामुळे शाळा व परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळा म्हणजे शिक्षणाचे पवित्र स्थान. याठिकाणी भविष्याचा जबाबदार नागरिक घडविला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक अतोनात प्रयत्न करत असतात. येथे स्वच्छता आणि आरोग्य राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
पण शाळेसमोर कचरा टाकला जातो हे पाहून खूप वाईट वाटते. लहान मुले इथे येतात, त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणं खूप गरजेचं आहे. दुर्गंधी, रोगराई आणि अस्वच्छतेमुळे त्यांचे आरोग्य धोक्मयात येत आहे. शिक्षक म्हणून आमची जबाबदारी आहे की मुलांना योग्य मूल्ये शिकवावीत, पण प्रत्यक्षात असं दृश्य त्यांना काय शिकवेल? असा प्रश्न मुख्याद्यापक यांनी उपस्थित केला आहे. वर्गामध्ये दुर्गंधी येत असल्याने लहान मुलांचे लक्ष अभ्यासाकडे लागत नाही, तसेच डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने देखिल याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. तसेच पालक आणि स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकारचा निषेध करून कचरा टाकणाऱ्या लोकांना थांबविले पाहिजेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानग्रहण प्रक्रियेत कोणतीही बाधा येणार नाही.