भवानीनगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
बेळगाव : शहर परिसरासह उपनगरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. भवानीनगर, मंडोळी रोडवर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. या परिसरात एक शाळा असल्याने याच्या दुर्गंधीचा सामना शाळेतील मुलांना करावा लागत आहे. तसेच या परिसरात कुत्र्यांचा वावरही वाढला असून कुत्री सदर कचरा रस्त्यावर आणत असल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने या परिसरातील कचऱ्याची उचल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग नित्याचेच बनले आहेत. यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून परिणामी आरोग्याच्या समस्याही वाढण्याची शक्यता आहे. यासाठी वेळेवर कचऱ्याची उचल करून शहर स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र, संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे रोगराई पसरण्याचा धोकाही वाढला आहे. यामुळे कचऱ्याची उचल करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांतून होत आहे.
भवानीनगर, मंडोळी रोडवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साठला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच या परिसरात कुत्र्यांचा वावरही वाढला असून कुत्री कचरा रस्त्यावर घेऊन येत आहेत. यामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. भवानीनगर येथे एक शाळा असून सदर कचऱ्याचा विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी वाढली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सदर परिसरातील कचऱ्याची त्वरित उचल करण्याची मागणी रहिवाशांतून होत आहे.