For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगावनजीकच्या मार्कंडेय नदीपात्राच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिगारे

06:01 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
उचगावनजीकच्या मार्कंडेय नदीपात्राच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिगारे
Advertisement

नदीचा पूल म्हणजे कचराकुंडी झाल्याचा भास : कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Advertisement

उचगाव /वार्ताहर

बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील उचगावनजीक असलेल्या मार्कंडेय नदीच्या पुलावरून भाविकांकडून पुलावरून वाहनातूनच नदीपात्रात फेकण्यात येणारा केरकचरा, पुजेनंतरचा काही टाकाऊ पदार्थ तसेच घरातील जून्या वस्तू नदीच्या पात्रात न पडता पुलाच्या दुतर्फा पडत असल्याने मार्कंडेय नदीचे पूल म्हणजे कचराकुंडी झाल्याचा भास होत आहे. याचा नाहक त्रास या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे. यावर संबंधित खात्याने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे.

Advertisement

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील पश्चिम भागातून वाहणारी महत्त्वाची व शेतकरी वर्गाची जीवनदायीनी म्हणून ओळखली जाणारी ही मोठी नदी म्हणून मार्कंडेय नदीकडे पाहिले जाते. या मार्गावरून रोज हजारो वाहनांची, प्रवाशांची ये-जा असते. सध्या नदीच्या पात्रात पाण्याचा साठा मुबलक असल्याने व सदर नदीला सुळगा या ठिकाणी बंधारा घालून पाणी अडवल्याने पाण्याचा साठा दिसून येतो.

या भागातील अनेक भाविक, नागरिक या नदीच्या पात्रात घरातील टाकाऊ पदार्थ, याबरोबरच पूजेनंतरचे जे अवशेष राहतात असे सर्व पदार्थ टाकत असतात. हे एकंदरीत नदीच्या पात्रात टाकणं अतिशय चुकीचे आहे. कारण सदर पाणी हे साचलेले असल्याने असे पदार्थ टाकून नदीच्या पात्रातील पाणी खराब करण्याचा हा प्रकार आहे. अनेक पदार्थ टाकल्यानंतर कुजण्याची प्रक्रिया होऊन या पाण्याला दुर्गंधीही येते. अनेकवेळा नदीच्या पुलाच्या दुतर्फा पाहिले तर संपूर्ण नदीच्या पाण्यात अनेक पदार्थ पाण्यावर तरंगत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.

मयत कुत्रं, मांजर, उंदीर, घुशी

या भागातील अनेक नागरिक घरामधून मरण पावलेली कुत्री, मांजरे, उंदीर व घुशी सुद्धा या नदीच्या पात्रात टाकण्याची निर्बुद्धी दिसून येते. अनेक नागरिक अशा मयत झालेल्या या कुत्री मांजरासारख्या जनावरांना देखील या पाण्यात टाकून पाणी दूषित करतानाचे चित्र दिसून येते. शेतकरी शेतात काम करत असताना या नदीच्या पात्रातील पाण्याचा उपयोग अनेक वेळेला शेतीच्या कामाबरोबरच पिण्यासाठीसुद्धा करत असतो. मात्र अशी कुत्री, मांजरे टाकून पाणी दूषित केले तर नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही मोठा धोका आहे. याचीही जाणीव नागरिकांना राहणे आवश्यक आहे.

तरी या भागातील नागरिकांनी अशा पदार्थांना, वस्तूंना नदीच्या पात्रात स्थान न देता इतरत्र ते पदार्थ टाकून विल्हेवाट लावावी. व नदीपात्रातील पाणी स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, अशीही मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.