गुंड जेनिटो कार्दोझने कोर्टात आत्मसमर्पण करावे
तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा कायम : शिरदोण येथील 2019 चे दुहेरी खूनप्रकरण
पणजी : 2019 मध्ये शिरदोन समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या दोघांच्या खूनप्रकरणी जेनिटो कार्दोज याला दोषी ठरवण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. आशिष चव्हाण आणि न्या. भारती डांगरे यांनी कायम ठेवला आहे. अपील फेटाळून लावताना जेनिटो कार्दोझला 10 नोव्हेंबरपर्यंत उत्तर गोवा सत्र न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. शिरदोन येथील समुद्रकिनाऱ्यावर 10 मे 2019 रोजी झालेल्या गँगवॉरमध्ये कुख्यात गुंड जेनिटो कार्दोज आणि त्याचे सहकारी महावीर नाडर, डॉम्निक नाझारेथ याच्यासह सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल यांचा प्रतिस्पर्धी ‘मिरांडा’ गँगच्या सदस्यांकडे वाद झाला होता. दोन्ही गटांनी एकमेकांवर एका शॅकच्या बाहेर असलेल्या काचेच्या बाटल्या आणि चाकूने हल्ला केला होता.
या गँगवॉरमध्ये संतोष काळेल आणि फ्रान्सिस डिसोझा उर्फ मिरांडा या दोघांचा खून झाला होता. या खूनप्रकरणी जेनिटो कार्दोझसह सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल यांना भादंसंच्या कलम-302 खाली अटक करण्यात आली होती. म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा खून पूर्वनियोजित नसून अचानक झालेल्या वादातून घडल्याचा निष्कर्ष काढून सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवून तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. सत्र न्यायालयाच्या या तीन वर्षांच्या सक्तमजुरीच्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सत्र न्यायालयाच्या तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा कायम ठेवल्याने जेनिटो कार्दोझ याच्या अडचणीत भर पडली आहे. या निकालामुळे रामा काणकोणकर याला मारहाणीप्रकरणी जेनिटोला जामीन मिळाला तरी आत्मसमर्पण करण्यास सांगितल्याने त्याला तुऊंगातच खितपत पडावे लागणार आहे.