बेरोजगारांना लुटणाऱ्या टोळ्या कार्यरत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : पदांची जाहिरात आली नसतानाही देतात पैसे
पणजी : सरकारी नोकऱ्यांच्या मोहापायी फालतू माणसांच्या नादी लागू नका, असा सल्ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. नोकऱ्या जाहीरसुद्धा झालेल्या नसताना कुणाच्या तरी सांगण्याला भुलून लोक सरळ लाखो ऊपये त्यांच्या हवाली करतात, याला काय म्हणावे, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारी नोकऱ्या देण्याच्या आशेवर बेराजगारांची फसवणूक करणारी एक टोळीच राज्यात वावरत असून त्यात काही अधिकारीही गुंतले असल्याची चर्चा आहे. त्यासंबंधी सध्या अटकेत असलेल्या पूजा नाईक हिनेही दोन अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे,
त्यावरून या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे. मात्र असे असले तरी नोकऱ्यांचे आमिष दाखवून पैसे मागणाऱ्यांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ज्या नोकऱ्यांसाठी सरकारने जाहिरातसुद्धा केलेली नाही, अशा नोकऱ्यांसाठी देखील लोक पैसे देतात हे चिंताजनक आहे. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे सुशिक्षित लोकच जास्त करून अशा प्रकारांना बळी पडतात, त्याला कोण काय करणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे घोटाळे रोखण्यासाठी सरकारने कर्मचारी भरती आयोग स्थापन केला आहे. यापुढेही आयोगामार्फतच कर्मचारी भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. त्याद्वारे योग्यता आणि गुणवत्तेच्या निकषावरच नोकऱ्या नोकऱ्या देण्यात येतील. लवकरच आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
कुणालाही सोडणार नाही
गेल्या काही दिवसात उघडकीस आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यात गुंतलेली व्यक्ती कुणीही आणि कितीही मोठी असली तरी आपणासाठी सर्वजण एकसमान असून त्याचे पद, प्रतिष्ठा न पाहता एक गुन्हेगार म्हणून तिच्यावर 100 टक्के कारवाई होईल, असे आश्वासन पत्रकारांच्या एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी दिले. नोकऱ्यांचे प्रलोभन दाखवून फसवणूक करण्याची कित्येक प्रकरणे गेल्या काही दिवसात उघडकीस आली आहेत. त्यात प्रामुख्याने पूजा नाईक व तिचा मित्र अजित सतरकर यांचा समावेश आहे. त्याशिवाय सागर नाईक, सुनीता पाऊसकर व दीपाश्री गावस या त्रिकुटाचे दुसरे प्रकरण तर तिसऱ्या प्रकरणात एक सेवानिवृत्त आणि दुसरा सेवेत असलेला, अशा दोन बड्या सरकारी अधिकाऱ्यांचीही नावे उघडकीस आली आहेत. सध्या त्यांची चौकशी, कारवाई सुरू आहे. या प्रकरणात अन्य काही धेंडेही गुंतली असण्याची शक्यताही व्यक्त होत असून सध्या हा विषय राज्यभरात सर्वात जास्त चर्चिला जाणाऱ्या विषयांपैकी बनला आहे.
दोन लाख विद्यार्थ्यांची झाली नेत्रतपासणी
सर्वांना दृष्टी या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत राज्यात नुकत्याच राबविण्यात आलेल्या मोहिमेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण 33 हजार विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे. यापैकी 12 हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्यांचे वाटप करण्यात आले, तर 9 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेअंतर्गत सर्वांना दृष्टी या संकल्पनेवर हा उपक्रम राबविण्यात आला होता, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ठकसेन पूजा नाईकला पाच दिवसांची कोठडी
सरकारी नोकरीसाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या पूजा नाईक हिला डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. म्हार्दोळ पोलिसांनी अटक केल्यानंतर मंगळवारी तिला डिचोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डिचोली पोलिसस्थानकात आठ दिवसांपूर्वी एका व्यक्तीने नोकरीसाठी पूजा नाईक हिला दोन लाख रूपये दिले होते, परंतु नोकरी न देता फसवणूक केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार डिचोली पोलिसांकडून तिची चौकशी होत आहे.