पूर्व भागांमध्ये ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल
तोडणी कामे जोमात : कापणी, भात मळणी, कडधान्य पेरणीची कामेही सुरू
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या असून सध्या ऊस तोडणीची कामे जोरात सुरू आहेत. त्याचबरोबर भात कापणी, मळणी व कडधान्य पेरणीची कामेही सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाली आहे. बसवण कुडची, निलजी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी आदी गावामध्ये यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असले तरी, अन्य भागाच्या तुलनेत पूर्व भागामध्ये उसाचे उत्पादन चांगले आहे. या भागातील ऊस मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांना पाठविण्यात येतो. सीमा भागातील तसेच महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांच्या मजुरांच्या टोळ्या पूर्व भागामध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या ऊस तोडणीचे काम जोरात सुरू आहे. उसाचा वरील भाग (वाडी) हा शेतकरी वर्ग जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करतात. त्यामुळे सकाळच्या वेळी ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची ही गर्दी होत आहे. सध्या सर्वत्र ऊस तोडणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.
सध्या भात कापणीची धांदल
त्याचबरोबर भात कापणी, मळणी व कडधान्य पेरणी आदी कामेही सध्या शिवारात सुरू असल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे. या भागातील निम्म्याहून जास्त भात पिकाचे पावसाअभावी नुकसान झाले आहे.
मजुरांचा तुटवडा
भात पिकांची कापणी करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे तसेच या भागांमध्ये कडधान्य पेरणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्याने शेतकरी वर्ग विहिरी व कूपनलिकाद्वारे शेतामध्ये पाणी सोडून त्यानंतर कडधान्य पेरणी करत आहेत. सर्व कामे एकदाच आल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी परगावच्या मजुरांना घेऊन भात कापणी करण्यात येत आहे.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
भात मळणीही महिला मजुरांना घेऊन करण्यात येत आहे. यंदा बेळगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शासनाने तातडीने शिवाराची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.