चक्रेश्वरवाडीत आली गंगा...गंगबाव या जुन्या विहिरीतील पाण्याचा रंग बदलला!
भूगर्भीय वैशिष्ट्यांचा अभ्यास होण्याची गरज; ग्रामस्थांनी पाच गावातील शिवलिंगावर केला जलाभिषेक
भौगोलिक आणि धार्मिक वैशिष्ट्यानी पर्यटक आणि अभ्यासकांना ओढ लावणाऱ्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील गंगबाव या जुन्या विहिरीतील पाण्याचा रंग अख्यायिकेनुसार बदलल्याने ग्रामस्थांनी गंगा अली या श्रद्धेने पाच गावांच्या शिवलिंगावर जलाभिषेक घालुन धार्मिक विधी पूर्ण केला.या विहिरीला भूगर्भीय वैशिष्ट्य असल्याने त्याचा अभ्यास करून संशोधन करण्याची मागणी होत आहे.
अशमयुगीन संस्कृतीच्या पाउलखुना स्पष्ट करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील चक्रेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असणारी गंगबाव नावाने ओळख असणारी विहीर मुजली होती .गतवर्षी ग्रामस्थांनी लोकसहभागातून या विहिरीतील गाळ काढून विहीर खुली केली .या विहिरीच्या पाण्याचा रंग दर पाच वर्षांनी बदलतो अशी आख्यायिका होती.आख्यायिकेनुसार यावर्षी पाण्याचा रंग बद्दलल्याने ग्रामस्थांनी या पाण्याचा जलाभिषेक चक्रेश्वरवाडी, तीटवे,कपिलेश्वर ,गुडाळ आणि सिरसे इथल्या ग्रामदेवतेच्या शिवलिंगाला घालण्याची पूर्वापार प्रथा जपली.त्यानुसार चक्रेश्वरवाडी ग्रामस्थांनी आज पहाटे पाचही ठिकाणी शिवलिंगावर जलाभिषेक घातला.
ऐतिहासिक महत्व असणाऱ्या गंगबाव या विहिरीतील पाण्याचा रंग बदलल्याने ग्रामस्थांनी पाणीपूजन करून शिवलिंगाला जलाभिषेक घातला.दिवसभर भजन आणि आरतीपठण करण्यात आलं. धार्मिक महत्व असणाऱ्या या विहिरीतील पाण्याचा रंग काही कालावधीनंतर बदलतो.या विहिरीच्या पाण्याचा रंग बदलणे हे भूगर्भीय वैशिष्ट्यही असू शकते या वैशिष्ट्ययाचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दर पाच वर्षांनी या विहिरीतील पाण्याचा रंग बदलतो,पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे आम्ही ग्रामस्थांनी पाच गावातील शिवलिंगावर जलाभिषेक केला.या विहिरीतील पाण्याचं वैशिष्ट्य तपासण्यासाठी अभ्यास होणे गरजेचे आहे.त्यामधून येथील भूगर्भीय वैशिष्ट्य समोर येईल. -----सदाशिव भांदीगरे,सरपंच चक्रेश्वरवाडी.
२) गेली अनेक वर्षे ही विहीर मुजली होती.आम्ही गावातील जेष्ठ नागरिकांनी एकत्रित येत गतवर्षी विहिरीतील गाळ काढला.गतवर्षी दुधासारखा असणारा पाण्याचा रंग निळा झाला आहे. पाण्याचा रंग बदलल्यानंतर गंगा आली असं पूर्वापार मानले जाते.त्यानुसार धार्मिक कार्यक्रम केले. -----विष्णू कुसाळे,जेष्ठ नागरिक.