विट्यात गर्दीत खिसे कापणारी टोळी जेरबंद
एक लाख 39 हजारांची रोकड जप्त : नऊ संशयितांना अटक
विटा प्रतिनिधी
गर्दीचा फायदा घेवून खिसे कापणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई रविवारी 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी नऊजणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 39 हजार 200 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
सूरज उद्धव पवार (27), रमाकांत आनंदा कांबळे (36), आकाश साहेबराव वाघमारे (24), राजेश विठ्ठल शाहीर (34), अविनाश लालासाहेब कांबळे (27), दत्ता लालासाहेब कांबळे (28), अक्षय शिवाजी सनमुखराव (34), विलास लक्ष्मण शिंदे (26, सर्व रा. राजीवनगर, लातूर, जि. लातूर) आणि बिलाल गुलाब नबी खान (54, रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक डोके यांनी दिली.
शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास नागेवाडी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या रॅलीमधून अज्ञात चोरट्यांनी खिशातून रक्कम चोरीस नेल्याची फिर्याद सतिष नानासा निकम यांनी विटा पोलिसांत दिली होती. चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अंमलदारांना सूचना दिल्या होत्या.
विटा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना 7 ते 8 इसम संशयितरित्या विटा बसस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती गोपनिय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यांना ताब्यात घेवून झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक लाख 39 हजारांची रोकड मिळून आली. रक्कमेबाबत अधिक चौकशी केली असता मनोज जरांगे-पाटील यांच्या नागेवाडी, विटा आणि शिरगाव येथील रॅलीमधून चोरी केली असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. संशयित आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांचेकडून आणखी गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक डोके यांनी दिली.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सागर गाययकवाड, हवालदार उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरकर, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, विकास जाधव, कृष्णात गडदे, कॅप्टन गुंडवाडे, वैभव कोळी, प्रशांत चव्हाण यांच्या पथकाने केली.