बेंगळुरात सामूहिक बलात्कार; तिघांना अटक
बेंगळूर : बेंगळूरच्या मादनायकनहळ्ळी येथील घरात घुसून एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या घृणास्पद गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी दोन संशयितांचा कसून शोध घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण एसपी सी. के बाबा यांनी दिली. नेपाळी वंशाची पीडित महिला आणि तिचे कुटुंब मादनायकनहळ्ळी येथे भाड्याच्या घरात राहतात. 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पीडिता राहत असलेल्या घरात घुसलेल्या पाच जणांच्या टोळीने ‘पोलिसांचे खबरी’ असल्याचा दावा केला.
तुमच्या घरात गांजा आणि वेश्याव्यवसाय चालविल्याचा संशयितांनी कुटुंबावर आरोप केला. त्यानंतर त्यांनी प्राणघातक शस्त्रे दाखवून घरातील लोकांवर हल्ला केला. दरम्यान, घरातील सर्व लोकांना बांधून मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी महिलेला शेजारच्या घरात घेऊन जात पाचपैकी तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या भयानक कृत्यानंतर, आरोपींनी घरातून पैसे आणि मोबाईल फोन घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर पीडितेच्या 14 वर्षांच्या मुलाने धाडस दाखवत पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मादनायकनहळ्ळी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.