गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडा! पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे आवाहन : 1700 हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज असून, 1 हजार 700 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गणेशोत्सव बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. गणेश आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नये. तसेच यावर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तीने पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले.
पंडित म्हणाले, गणेशोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तयारीचा आढावा विशद करीत, महिनाभरापासून जिल्हा पोलीस दलाने विविध सार्वजनिक मंडळे, मूर्तीकार, ध्वनी आणि प्रकाश व्यावसायिक यांच्यासह विविध यंत्रणांशी संवाद साधून चर्चा केली आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस दल सज्ज झाले असून, गणेशोत्सव काळात कोठे अनुचित प्रकार घडू नये याकरीता 1700 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गणेशोत्सवात अहोरात्र कर्तव्य बजावणार आहेत. याशिवाय होमगार्ड आणि राखीव दलाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. सुमारे 1 हजार 144 समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवेळी कोणत्याही गणेश मंडळाला ध्वनी कायद्याचे उल्लंघन करता येणार नाही असे सांगून यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी पर्यायी मार्गाचाही अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.
अश्लिल नृत्य सादर केले तर कारवाई
गणेश विसर्जन मिरवणुकीत किंवा गणेशोत्सवादरम्यान कोणीही अश्लिल नृत्य सादर केले तर संबंधितांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केले. संपूर्ण गणेशोत्सव मांगल्यमय वातावरणात साजरा व्हावा यासाठी नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.