गोव्यात गणेशोत्सव राज्योत्सव व्हायलाच हवा
पर्यटनाचा नामजप करता करता मूळ गोमंतकीयत्व हरवू नये म्हणून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गोव्याचा सर्वांत मोठा उत्सव व वैशिष्ट्यापूर्ण गणेशोत्सव जपून ठेवण्यासाठी जनता व सरकार यांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक असून त्यासाठी पहिल्या प्रथम गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून घोषीत करुन त्याद्वारे कृतीकार्यक्रम निश्चित करुन त्याच्या प्रामाणिक अंमलबजावणीला प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.
गोव्यातील गणेशचतुर्थी म्हणजे गणेशोत्सव वैशिष्ट्यापूर्ण असून त्यात पारंपरिकता ठासून भरलेली आहे. जगात असा गणेशोत्सव कुठेच अनुभवायला मिळत नाही. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सवाचे गणेशोत्सवाशी काहीसे साधर्म्य आहे. गोव्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असलेल्या या संचिताचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. काळानुसार काही गोष्टी बदलत असल्या तरी जे मूळ अधिष्ठान असते ते बदलता कामा नये, हे विसरुन चालणार नाही. आजच्या पर्यटनाच्या जमान्यात गोवा बदलून गेला आहे. मात्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक ही राज्ये का बदलली नाहीत? गोव्याने त्या राज्यांकडून धडा घ्यायला हवा. पर्यटनाचा नामजप करता करता मूळ गोमंतकीयत्व हरवू नये म्हणून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गोव्याचा वैशिष्ट्यापूर्ण गणेशोत्सव जपून ठेवण्यासाठी जनता व सरकार यांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक असून त्यासाठी पहिल्या प्रथम गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून घोषीत करुन त्याद्वारे कृतीकार्यक्रम निश्चित करुन त्याच्या प्रामाणिक अंमलबजावणीला प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.
श्रावणाच्या प्रारंभापासूनच गोमंतकीयांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. गणेशमूर्ती आणण्यापासून विसर्जनापर्यंतचे संपूर्ण विधी पारंपरिक, वैशिष्ट्यापूर्ण आहेत. पारंपरिक गणेशोत्सव संपूर्णत: पर्यावरणस्नेहीच होता. पूजनासाठी जी गणेशमूर्ती आणतात ती मृण्मयी म्हणजे मातीचीच आणि मातीचीच असायला हवी, अगदी धर्मशास्त्रानुसार आणि विज्ञानानुसारही! पीओपीची मूर्ती पूर्णत: निषिद्ध आहे. कागदी मूर्ती म्हणजे निसर्गसंहारच. आज आपण एवढा काँक्रीटचा विकास केलाय, पण आपल्या जीवनाला व्यापून राहिलेली माती आम्हाला गणपतीसाठी मिळत नाही काय? पीओपीच्या गणेशमूर्तींना बंदी घालावी म्हणून पहिल्या प्रथम गोवा विधानसभेत आपल्या खासगी विधेयकासह आवाज उठविला तो आजचे गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामू नाईक यांनी. तत्कालीन पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पर्यावरण संवर्धन कायद्यात पीओपीच्या मूर्तींना बंदी असल्याचे स्पष्ट करुन ते विधेयक मागे घेण्यास नाईक यांना सांगितले. नाईक हे गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष बनले आणि पीओपीविषयी जागृती केली. पोलिसांच्या मदतीने त्यांनी स्वत: जमिनीवर उतरुन कारवाईत भाग घेतला. संपूर्ण गोव्यात गणेशमूर्तीकारांच्या चित्रशाळांमध्ये जाऊन त्यांनी समस्या जाणून घेतल्या. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेशमूर्तीकारांना मदतीचा हात म्हणून अनुदान देण्याची योजना नाईक यांनी महामंडळाच्या माध्यमातून सुरु केली. त्यांच्यानंतर कुणी फारसे गांभीर्य दाखविले नाही. पीओपीच्या मूर्ती गोव्याच्या हद्दीत पोहोचणारच नाहीत, यासाठी सरकारी यंत्रणा दोन महिन्यांपूर्वीच कारवाई का करत नाही? कारवाई गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी करुन तुम्ही कुठली मर्दुमकी गाजवायला पाहता? हजारो गणेशमूर्ती असलेल्या दुकानाला आदल्या दिवशी सील ठोकणारी तुमची अक्कल कुठली? मेंदुतली की ढोपरातली? असे प्रश्नच विचारणाऱ्यांची चूक कोणती?
माटोळीचे वैशिष्ट्या टिकवून ठेवण्यासाठी आजच्या पिढीला तिच्या प्रयोजनाचे ज्ञान द्यायला हवे. माटोळी फक्त गोव्याचेच वैशिष्ट्या आहे. निसर्गाच्या देण्याने माटोळी समृद्ध करता येते, तिथे प्लास्टिक वा अन्य अनैसर्गिक गोष्टींचा वापर होता कामा नये. माटोळीचे सामान रानातून बाजारात उपलब्ध करणाऱ्या कष्टकऱ्यांना अनुदान, विमा कवच देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. कष्टकऱ्याने कष्टांचे फळ मिळेल व सामानाचे दर नियंत्रित राहतील, हे पहायला हवे. या कष्टकऱ्यांना सोपो कर माफ करुन गोवा सरकारने चांगलेच केले आहे. राज्योत्सव जाहीर करुन हे वैशिष्ट्या जपले पाहिजे.
गणपतीसमोर जी आकर्षक सजावट किंवा देखावे केले जातात हे गोव्याच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्या. पौराणिक, सामाजिक, पर्यावरणीय, राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे देखावे पर्यावरणपूरकच असावे. थर्मोकोल, प्लास्टिकचा वापर होताच कामा नये. थर्मोकोल पर्यावरणाला घातक आहे. केळीचे केळमे, गबे, शिरत्या, बांबू, माडाची चुडते व अन्य भाग, पोफळी अशा पर्यावरणपूक वस्तूंनी केलेली आरास हे गोव्याच्या निसर्गसमृद्धीचे प्रतीक आहे. घुमट आरत्या हे सुद्धा केवळ गोव्याच्याच गणेशोत्सवाचे वैशिष्ट्या. काही शाळांमध्ये घुमट आरत्या शिकवायला लागल्याने तसेच काही वाड्यांवर आरती मंडळे तयार झाल्याने या वैशिष्ट्याला चांगले दिवस आले आहेत. मात्र घुमटे तयार करण्यासाठी माती आवश्यक आहे. आरत्यांच्या नावाखाली भक्तीगीते म्हटली जाऊ नये. शाळांमध्ये झांझ, शमेळ व घुमटवादनही शिकवायला हवे. गोव्यातील गणेशोत्सवाला दोन हजारपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे, पण त्यात कधी दारुकामाची आतषबाजी नव्हती. हिंदुंच्या कोणत्याच धर्मग्रंथात कधीच फटाके, बाँब लावण्याचा उल्लेख पुसटसाही नाही. पोर्तुगीज गोव्यात आल्यानंतर ते फेस्त साजरे करु लागले आणि त्यात दारुकामाची आतषबाजी केली जायची, त्याचीच सवय हिंदुंना झाली. गोवा मुक्तिनंतर श्रीमंती आली... दारुकामाचे पेव फुटले. हे कुठे तरी थांबले पाहिजे. पर्यावरणघातक असलेली ही आतषबाजी माणसांच्या जीवावरही उठते. कोट्यावधी रुपयांची क्षणात विषारी राख बनून जाते. तरीही अशा वस्तूंचे मोठमोठे स्टॉल थाटण्यास परवानगी देऊन कसे चालेल? फुगड्या, दिंडीने गणेशमूर्ती विसर्जनाला नेण्याची गोव्याची पूर्वापार परंपरा. लाऊडस्पीकर, डीजेसारख्या प्रदूषणाच्या प्रथा गोव्यात नव्हत्या. मात्र संपूर्ण जगात वैशिष्ट्यापूर्ण ठरलेल्या गोव्यातील गणेशोत्सवाला अलीकडे या प्रकारांचे गालबोट लागत आहे. गोव्यातील बहुतांश ठिकाणची गणेशमूर्ती विसर्जनस्थळे सुलभ, सुरक्षित नाहीत. ही स्थळे म्हणजे वर्षभरासाठी उकीरडे बनल्यासारखी असतात ही किती खेदजनक बाब? त्यांची सुधारणा करण्यासाठी जनता व सरकार भागीदारी आवश्यक आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत, ज्यामध्ये सुधारणा व्हायला हव्यात. समस्या, अडचणी आहेत तिथे सरकारी मदतीचा हात मिळायला हवा. गोव्याचा पारंपरिक, पर्यावरणपूरक वैशिष्ट्यापूर्ण गणेशोत्सव जपण्यासाठी त्याला राज्योत्सवाची मान्यता दिली पाहिजे. त्यात आधुनिकतेच्या नावाखाली कसल्याच प्रकारचे प्रदूषण येणार नाही, याची खात्री करुन घ्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा’ चांगला प्रयत्न केला असून त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सवाला राज्योत्सवाची मान्यता देऊन विविध योजना आखून त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी झाल्यास गोव्याच्या या वैशिष्ट्याचे संवर्धन होईलच. मंगलमूर्ती मोरया!
राजू भिकारो नाईक