आचरा रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव रंगणार 39 दिवस
विविध धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
आचरा | प्रतिनिधी
आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे रामेश्वर मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना दिमाखात झाली असून यावर्षी 39 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त कीर्तन, आमने -सामने डबलबारी भजन, फुगडी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, दर्जेदार ऑर्केस्ट्रा, विविध मंडळाचे दशवतार, भजने असे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीचे सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे.39 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार असून रविवार दि. ०७ सप्टेंबर रोजी रात्री श्री ब्राह्मणदेव मिराशीवाडी व महापुरुष मित्रमंडळ वरचीवाडी पुरस्कृत वालावलकर दशावतार नाट्यमंडळ ओसरगाव यांचा दशावतार नाट्य प्रयोग कालभुजंग संहार, दि. ०८ रोजी रात्री श्री बाळगोपाळ मंडळ आचरा-वरचीचावडी आयोजित भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम भक्तिरंग होणार आहे, बुधवार दि. १० रोजी रात्री व्यापारी मंडळ आचरा आणि वैभवशाली पतसंस्था पुरस्कृत कीर्तनकार ह. भ. प. हरिहर नातू (पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन, शुक्रवार दि. १२ रोजी रात्री समर्थ नगर वरचीवाडी पुरस्कृत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ कुडाळ नेरूर यांचा नाट्य प्रयोग ब्रह्म संकेत, शनिवार दि. १३ रोजी रात्री श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा- पारवाडी पुरस्कृत श्री हेळेकर दशावतार नाट्य मंडळ, कारीवडे यांचा नाट्य प्रयोग वैभवलक्ष्मी हा होणार आहे, दि. १४ रोजी रात्री शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स बाणे पुरस्कृत सुधीर कलींगण कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ कुडाळ नेरूर यांचा नाट्य प्रयोग गोमय गणेश, दि. १५ रोजी रात्री ब्रह्म्होन्नती मंडळ पिरावाडी पुरस्कृत कार्यक्रम, दि. १६ रोजी रात्री श्री. संतोष कोदे पुरस्कृत गुरुकृपा दशावतार लोककला नाट्यमंडळ कणकवली हळबल यांचा नाट्य प्रयोग सवतीचे प्रेम, बुधवार दि. १७ रोजी रात्री मनोज हडकर पुरस्कृत डबलबारी बुवा - श्री. गुंडू सावंत. हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे, ता. कुडाळ, पखवाजसाथ विराज बावकर व तबलासाथ संकेत गोसावी यांच्या विरुद्ध बुवा दिनेश वागदेकर डुंगो कमला प्रासादिक भजन मंडळ शेळपी, ता. वेंगुर्ला, पखवाजसाथ सचिन राणे, तबलासाथ अजित मार्गी यांची राहणार आहे. १८ रोजी रात्री वाडोळी ग्रामस्थ आचरा - भंडारवाडी पुरस्कृत लावण्य तारका ऑर्केस्ट्रा (मुंबई) २० सप्टेंबर रात्री हिर्लेवाडी विकास मंडळ पुरस्कृत तारका - चिमणीपाखरं डान्स अॅकॅडमी कुडाळ यांचा कर्यक्रम, २१ सप्टेंबर रोजी डोंगरेवाडी ग्रामस्थ पुरस्कृत कार्यक्रम, २७ सप्टेंबर रोजी नृत्य स्पर्धा संपर्क - बाबू कदम ९४२१५७४७००, सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा व रात्री इसवटी मंडळ, आचरा - जामडूल आणि श्री. प्रविण प्रभाकर मेस्त्री पुरस्कृत तिरंगी डबलबारीचा जंगी सामना बुवा - सुशांत दिलीप जोईल, बुवा - श्री. उदय पारकर, बुवा - श्री. सुजित परब यांच्यात रंगणार आहे. शुक्रवार दि. ०३ ऑक्टोबर रोजी रात्री देऊळवाडी मित्रमंडळ पुरस्कृत मंगळागौरी जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा होणार आहे. शनिवार दि. ०४ ऑक्टोबर रोजी रामेश्वर मंदिर ते आचरा समुद्र किनारा अशी मिरवणूक निघून गणेश विसर्जन होणार आहे.