महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गणेश महात्म्य,सास्मित समाधी

06:30 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Ganesha Mahatmya, Sasmit Samadhi
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा राजाला म्हणाले, सवितर्क समाधीमध्ये आराध्याची आपल्या कल्पनेनुसार मानसपूजा करून ते रूप ध्यानात धरून जप करणे साध्य होऊ लागले की, पुढेपुढे कोणत्याही कल्पनेशिवाय, केव्हाही आणि कुठेही आराध्याची मूर्ती नजरेसमोर उभी राहून त्यावर लक्ष केंद्रित करता येते. याला सविचार समाधी असं म्हणतात. अशी एकाग्रता साधली असताना एकीकडे आपले दैनंदिन व्यवहार चालूच असतात पण ते पार पाडत असताना सविचार समाधी साधण्याच्या प्राप्त झालेल्या कौशल्यामुळं आणि त्यातील आनंद अनुभूतीमुळं आपल्यात एक वेगळाच उत्साह आलेला असतो. तसेच आपल्याला तीच आनंदानुभूती पुन्हा घेता येणार आहे हे लक्षात घेऊन दिवसभर आपण त्या आनंदाच्या धुंदीत वावरत असतो. आत्तापर्यंत विषयसुखात रममाण झाल्याने किती मोठ्या आनंदाला आपण मुकलो होतो याची खात्री होऊन, आपल्याला विषयसुखाची इच्छाच काय, त्याचे विचारही मनात येत नाहीत. माणसाला जेव्हा काहीतरी मोठी गोष्ट प्राप्त होते तेव्हा त्याच्याकडून लहान गोष्टीचा आपोआपच त्याग होतो.

Advertisement

आणखी एक सांगायचे म्हणजे, मनुष्य आवडती गोष्ट करू लागला की, त्याला ती गोष्ट करत असताना झालेले श्रम बिलकुल जाणवत नाहीत. त्याप्रमाणे साधकाला कोणत्याही वस्तुशिवाय आनंद मिळू लागला की, येथून पुढे साधकाला अभ्यासाविषयी श्रम असे पडत नाहीत. आदल्या दिवशी अनुभवलेले समाधीसुखाचे गोड अनुसंधान आणि दुसऱ्या दिवशी मिळणाऱ्या समाधीसुखाची मधुर ओढ या दोन्हीमुळे मिळणाऱ्या समाधीसुखाच्या सुखद धुंदीत आवश्यक ती प्रापंचिक कर्तव्ये यथाक्रम चालू राहतात. ती पार पाडत असतानासुद्धा त्याचे अनुसंधान चालू असते. सविचार समाधीतील आनंदाच्या अनुभूतीचा दर्जा खूप वरचा असल्याने व त्यात सतत नवनवीन भर पडत असल्याने त्याची धुंदी कायम टिकून राहते. अशा प्रकारे आनंदाची अनुभूती नित्य येऊ लागली की, सविचार समाधीची पक्वावस्था गाठली असे म्हणता येईल. सविचार समाधीच्या दिर्घकाळच्या अभ्यासाने आराध्याचे मनोमय ध्यान घडून चित्ताची प्रसन्नता सहज राहू लागली म्हणजे सानंद समाधी या संप्रज्ञात समाधीच्या तिसऱ्या टप्प्याचा अभ्यास साधक सुरू करू शकतो.

आराध्याचे मनोमय ध्यान घडून चित्ताची प्रसन्नता राहू लागली म्हणजे संप्रज्ञात समाधीच्या सानंद समाधी या तिसऱ्या टप्प्याच्या अभ्यासास साधक लायक होतो. विषयोपभोग मिळाले, तीव्र इच्छा मोठ्या प्रयत्नाने पूर्ण झाली, चित्तात शांती आणि समाधान वृत्ती नांदू लागली की, माणसाला आनंद होतो. वरील कारणांनी होणाऱ्या आनंदाचा दर्जा एकापेक्षा एक वरचढ असतो. पहिल्या दोन प्रकारांनी होणाऱ्या आनंदाला काही ना काही कारण असते पण तिसऱ्या प्रकारचा आनंद कारणाशिवाय होत असल्याने त्याचा दर्जा सर्वोच्च असतो. पहिल्या दोन प्रकारातील आनंद तो ज्या कारणाने होत आहे त्याचे नाविन्य संपले की ओसरू लागतो. मनुष्य मुळात असमाधानी असल्याने त्याला लगेच पुढच्या उद्दिष्टांचे वेध लागतात पण तिसऱ्या प्रकारचा आनंद कोणत्याही कारणाशिवाय झाला असल्याने तो चित्तात सदैव वास करून राहतो. या अवस्थेला सानंद समाधी असे म्हणतात. या अवस्थेत साधकाला एखादी इच्छा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करायची कला साधलेली असते. या अवस्थेत मी आनंदी आहे ही साधकाची वृत्ती कायम टिकून असते. मी आनंदी आहे ही आनंदाची जाणीव सुद्धा पुढे पुढे नाहीशी करण्याची कला साधकाला साधता येते. हे साध्य झालं की, मला दु:ख नाही म्हणून मी आनंदी आहे हे आनंद होण्याचे कारण नष्ट झाल्याने साधकाचा पुढच्या टप्प्याचा अभ्यास सुरू होतो. या टप्प्यात केवळ मी आहे म्हणजे अस्मि एव्हढीच जाणीव उरते. ह्या अवस्थेला सास्मित समाधी असे म्हणतात. ह्यात क्लेशदायक वासना नष्ट झालेल्या असतात. त्यामुळे मी आनंदी आहे असे वेगळे वाटण्याचे कारण उरत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article