बसवण कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्रीत गणेश विसर्जन
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मंगळवारी जड अंत:करणाने गणरायाला निरोप देण्यात आला.पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मावीनकट्टी, मोदगा, पंत बाळेकुंद्री, मारीहाळ, सुळेभावी आदी गावांमध्ये दुपारनंतर सार्वजनिक श्री गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. काही मंडळांनी श्री गणरायासमोरील साहित्याचा लिलाव करून नंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केले ढोलपथक, वारकरी भजनी मंडळ आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात येत होत्या. काही मंडळांनी डॉल्बीचा वापर केला.
रात्री उशिरापर्यंत डॉल्बीच्या आवाजात मिरवणुका सुरू होत्या. डॉल्बीसमोर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. यंदा पूर्वभागामध्ये चांगला पाऊस झाला असल्याने गावागावातील तलाव तुडुंब भरले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये तलावामध्येच श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात येत असल्याचे पहावयास मिळाले. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरामध्ये गणरायाला जड अंत:करणाने निरोप देण्यात येत होता. गणरायाचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला निरोप देण्यात आला. प्रत्येक गावांमध्ये मारिहाळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
बाळेकुंद्री : सार्वजनिक गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मंडळानी फटाक्याची आतषबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी बाळेकुंद्री गावच्या किरण जाधव यांच्या शेतातील विहिरीत मूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले. मुतगा, मोदगा, सांबरा, होनिहाळ, पंत बाळेपुंद्री, मारीहाळ, सुळेभावी, हुदली.व आदी गावात ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो व आदी वाहनांना सजवून विद्युत रोषणाई करून सजावट केली होती.. बॅन्ड, बेंन्झा, भजनी मेळा, झांजपथक, ढोल ताशे व डॉल्बीच्या दणदणाटात सार्वजनिक गणेशमूर्ती मंडळांनी गावातील प्रमुख गल्लीतून फटाक्यांची आतषबाजी करीत मंगळवारी रात्री उशिरा मूर्तींचे विसर्जन केले.यावेळी मारिहाळ पोलीस ठाण्याचे सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी यानी फिरता पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
कडोली-जाफरवाडी, केदनूर
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात कडोली येथील घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात आला. विसर्जन सोहळ्यातील हजारो कार्यकर्ते आणि गणेशभक्तांना संगमेश्वर येथील हॉटेलचे मालक आणि कडोली ग्राम पंचायत सदस्य राजू गणपती कुट्रे यांच्याकडून अन्नदानाची सेवा करण्यात आली. यावर्षी डीजेला फाटा देवून कडोली, जाफरवाडी, केदनूर, देवगिरी, गुंजेनहट्टी आदी गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाला निरोप दिला.