मद्दूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट
मद्दूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट : दगडफेकीच्या घटनेमुळे तणाव : 21 जणांना अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंड्या जिल्ह्यातील मद्दूर शहरात रविवारी रात्री उशिरा गणेश विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मद्दूर शहरात तणाव निर्माण झाला. हा पूर्वनियोजित कट असून आरोपींना अटक करावी, अशी मागणी करत रस्त्यावर उतलेल्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 21 जणांना अटक केली आहे. खबरदारी म्हणून मद्दूर शहरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान सदर 21 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मद्दूरमधील राम रहीम नगरशेजारी असलेल्या चन्नेगौडा कॉलनीलगत गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रविवारी रात्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक राम रहिमनगरमध्ये आली. यावेळी अन्यधर्मिय तरुणांनी दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणून विसर्जन मिरवणूक सुरळीत केली. दगडकेफीच्या घटनेत 4 होमगार्डसह 8 जण जखमी झाले.
मद्दूरमधील गणेश विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेनंतर रविवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन हाती घेतले. मिरवणूक मशिदीसमोर आल्यानंतर लाईट बंद करून दगडफेक करण्यात आली, असा आरोप आंदोलकांनी केला. दगडफेक करणाऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात महिला आणि मुलेही सहभागी झाली होती. त्यांनी शहरातील जामिया मशिदीसमोर निदर्शने केली. जोपर्यंत समाजकंटकांना अटक होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. लाठीमारामुळे तणावात भर पडली. दुकाने बंद करण्यात आली. अघोषित ‘बंद’ची स्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर शहरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. बाहेरून अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागविण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंड्या जिल्हा पोलीस प्रमुख मल्लिकार्जुन बालदंडी यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. घटनेप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दगडफेक प्रकरणी 21 जणांना अटक केली आहे. यापैकी दोघेजण चन्नपट्टणमधील तर उर्वरित स्थानिक रहिवासी आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी राहणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जमावबंदी हटवावी का, याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे निर्देश
मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथील संघर्षाची माहिती मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांकडून मिळविली. तणाव निवळण्यासाठी खबरदारी घ्यावी. तणाव निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्यांना अटक करावी. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.
काँग्रेस सत्तेवर आल्यापासून कर्नाटकात हिंदूंचा अपमान
भाजपमुळे राज्यात शांततेचा भंग होत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. परंतु, राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यापासून कर्नाटकात हिंदूंचा अपमान होत आहे. त्यांच्या भावना दुखावल्या जात आहे. हिंदूंवर गुन्हे दाखल केले जात आहे. मद्दूरमध्ये महिलांवर लाठीमार करण्यात आला आहे. ही घटना किरकोळ असल्याचे सांगणाऱ्या गृहमंत्र्यांचे वर्तन लज्जास्पद आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली आहे.
परिस्थिती नियंत्रणात!
मद्दूरमध्ये गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तेथे अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मद्दूरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागांना भेट देऊन पाहणी केली आहे.
- डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री