शहर परिसरात आज गणेश जयंती
विविध धार्मिक कार्यक्रम, भक्तांनी फुलणार मंदिरे
बेळगाव : शहर परिसरात शनिवारी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने विविध गणेश मंदिरातून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासून काकड आरती, गणहोम, अभिषेक, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाची रेलचेल पहावयास मिळणार आहे. गणेश जयंतीनिमित्त भक्तांनी मंदिरे फुलून जाणार आहेत. चन्नम्मा येथील गणेश मंदिर, हिंडलगा येथील विनायक मंदिर येथे गर्दी होणार आहे.
शहरातील चन्नम्मा सर्कल गणपती मंदिर, मिलिटरी विनायक मंदिर, जुने बेळगाव नाका गणपती मंदिर, लक्ष्मी रोड गणेशपूर, अनगोळ नाका टिळकवाडी, हिंदूनगर टिळकवाडी, राणी चन्नम्मानगर पहिला क्रॉस, सिद्धीविनायक मंदिर भेंडीबाजार, सिद्धीविनायक मंदिर सरस्वतीनगर, बाजार गल्ली वडगाव, राणी चन्नम्मानगर गणेश मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर गणेश मंदिरेही भक्तांसाठी सज्ज करण्यात आली आहेत. विशेषत: सर्व मंदिरातून धार्मिक विधी होणार आहेत. तसेच पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांची वर्दळही वाढणार आहे. त्याबरोबर काही मंदिरांमध्ये सत्यनारायण पूजा, जप, भजन, मंत्रपुष्प आणि तीर्थप्रसादाचेही वाटप केले जाणार आहे. तर काही मंदिरांमध्ये रात्री जागर भजन आणि महाआरतीही होणार आहे.