For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूरसह तालुक्यात भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन

10:42 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूरसह तालुक्यात भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन
Advertisement

दहा दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध कार्यक्रम : पुढच्या वर्षी लवकर या... : विसर्जन वेळेत करण्यासाठी आदल्या दिवशीच श्रीफळांचा लिलाव

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गणरायांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. घरगुती गणपतींचे दुपारी 12 नंतर विसर्जन करण्यात आले. रात्री 10 वाजेपर्यंत घरगुती गणपतींचे विसर्जन मलप्रभा नदीघाटावर करण्यात आले. तर ग्रामीण भागात नदी, तलाव, ओढ्यात आणि विहिरीत विसर्जन करण्यात आले. तर सार्वजनिक गणपतींचे विसर्जन बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होते. नगरपंचायतीने सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था केल्याने  श्रीमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले.

मंगळवारी दुपारी 12 नंतर मलप्रभा नदीकाठावर घरगुती गणपतींच्या विसर्जनास सुरुवात झाली. शहरासह विद्यानगर, शिवाजीनगर, हलकर्णी, दुर्गानगर, गुरुकुल कॉलनी, हिंदूनगर यासह शहरातील सर्व गल्ल्यांतून घरगुती गणपती डोक्यावरून, चारचाकी वाहनातून आणण्यात येत होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात तसेच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गणपतीच्या जयजयकाराच्या घोषणा देत, गणेशमूर्ती विसर्जनासाठी मलप्रभा नदीघाटावर आणण्यात येत होत्या. शेवटची पूजाविधी आणि आरती केल्यानंतर गणपतीचे विसर्जन करण्यात येत होते. घरगुती गणपतींचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नगरपंचायतीने खास व्यवस्था केली होती. नदीघाटावर प्रकाश योजना तसेच मोठ्या गणपतींसाठी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली होती. नगरपंचायतीचे कर्मचारी आणि बचाव पथकही तैनात केले होते.

Advertisement

शहरातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू व्हावी, या उद्देशाने श्रीफळ सवाल आदल्यादिवशीच केले होते. मात्र सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुका रात्री 12 नंतर सुरू झाल्या. शहरातील विविध मार्गावर गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले. गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी राजा छत्रपती चौक ते बेंद्रे खुट्टपर्यंत आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणाई ठेका धरत नाचत तल्लीन झाली होती. डीजे आणि ढोलपथकांच्या आवाजाने सारे खानापूर शहरच दणाणून गेले होते.

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सकाळी 7 पर्यंत सुरू होती. शेवटच्या गणेशाचे विसर्जन 8 सकाळी वाजता झाले. शहरासह ग्रामीण भागातील गणपती विसर्जनासाठी मलप्रभा नदीघाटावर आणण्यात आले होते. यात झाडअंकले, गणेबैल, वाघवडे, इदलहोंड, माळअंकले डुक्करवाडी, नागुर्डावाडा यासह इतर गावांचेही गणपती मलप्रभा नदीत विसर्जनासाठी आणण्यात आले होते. सार्वजनिक 18 गणपतींचे विसर्जन मलप्रभा नदीघाटावर करण्यात आले. नगरपंचायतीच्यावतीने क्रेनची व्यवस्था केली होती. यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी तैनात होते.

मंगळवारी शहरातील सार्वजनिक श्रीविसर्जन पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सर्व रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते. यावर्षी सर्व गणेश उत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती आकर्षक आणि सुबक होत्या. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. मंगळवारी सकाळी पोलिसांचे शहरातून गणपती विसर्जन मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, पोलीस उपनिरीक्षकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहरासह तालुक्यात विसर्जन सोहळा शांततेने पार पडला.

ग्रामीण भागातही वाजत-गाजत गणेश विसर्जन

खानापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही घरच्या गणपतीबरोबरच सार्वजनिक गणपतीचे भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. शहराजवळील हलकर्णी तसेच गांधीनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वाजत-गाजत तसेच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा देत मिरवणुकीने जुन्या पुलाजवळच गणेश विसर्जन केले. या शिवाय नंदगड, गर्लगुंजी, गुंजी, करंबळ, चापगाव, कारलगा, हलशी, जांबोटी, कणकुंबी आदी भागातील सार्वजनिक गणेशमूर्तींचेही भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

Advertisement
Tags :

.