आडपईत रंगला गणेशमूर्ती विसर्जन सोहळा
चित्ररथ, दिंडी, फुगड्यांसह बाप्पांना जल्लोषात निरोप : केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊंसह अनेकांचा सहभाग,हजारो गणेशभक्तांनी अनुभवले चैतन्यदायी क्षण
फोंडा : गणेशचतुर्थी म्हणजे प्रत्येक लहान मोठ्यांना भाऊन टाकणारा उत्सव...आणि बाप्पाला निरोप देण्याचा विसर्जनाचा क्षण तर या अलोट उत्साहावरील कळसाध्यायच..! फोंडा तालुक्यातील आडपई गावातील प्रसिद्ध विसर्जन मिरवणुकीत तर या उत्साहाला येणारी भरती अवर्णनीयच...! गणपत्ती बाप्पांचा अखंड जयघोष आणि फुगड्या दिंडीने भारावलेल्या माहोलात बुडालेले भक्तगण... दरवर्षीचा तोच आनंद आणि उत्साह यंदाही या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाला. संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेली आडपई गावातील पाच दिवसांची ही गणपती विसर्जन मिरवणूक काल रविवारी सायंकाळी मोठ्या थाटात पार पडली. साधारण दोन तास चाललेल्या या मिरवणुकीच्या आनंदोत्सवात संपूर्ण गांव बुडाले होते. ग्रामस्थांबरोबरच गोव्याच्या विविध भागातून आलेले सगेसोयरे व मित्रमंडळींनीही या उत्साहाचा आनंद लुटला. मिरवणुकीतील उत्साहाचे हे क्षण आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्याचा मोह तर कुणालाच आवरता आला नाही.
चित्ररथ, फुगड्या, दिंडीला उधाण
देवदेवता आणि ऐतिहासिक महापुऊषांच्या प्रतिकृती तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे छोटेमोठे चित्ररथ देखावे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. फुगड्या, दिंडी आणि गणपती बाप्पांचा अखंड जयघोष....अशा जल्लोषात लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी भक्तीभावाने निरोप देण्यात आला. लहानांपासून वयस्करापर्यंत सर्वांनी आनंदाचे हे अनमोल क्षण अनुभवले. गावातील प्रत्येक कुटुंबातील गणपतीची उत्तरारती झाल्यानंतर सर्व गणपती आपल्या ठरलेल्या क्रमानुसार मिरवणुकीत सहभागी झाले. चित्ररथ देखाव्यात विराजमान प्रत्येक कुटुंबाचे गणपती वाजतगाजत दत्त मंडपाजवळ एकत्र आल्यानंतर सामूहिक आरती झाली व नंतर जुवारी नदीत श्रींचे विसर्जन करण्यात आले. आडपई गावातील पाच दिवसांची ही गणपती विसर्जन मिरवणूक केवळ फोंडा तालुकाच नव्हे, तर संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. फोंडा तालुक्यातील गणपती उत्सव काळातील हे खास आकर्षण बनून राहिले आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही आगळी वेळगी परंपरा गावातील नवीन पिढी तेवढ्याच उत्साहात, कदाचित त्यापेक्षा अधिक थाटामाटात पुढे नेत आहे.
गावातील कलाकारांच्या कलेचे दर्शन
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गावातील सर्व एकोणीस कुटुंबियांनी आकर्षक असे चित्ररथ देखावे तयार कऊन त्यात आपल्या गणरायाला विराजमान करीत वाजत गाजत निरोप दिला. भगवान श्रीकृष्ण, वराह अवतार, श्री विठ्ठल या देवतांसह दशानन रावण, वीरभद्र, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे आदी देखाव्यातून गावातील कलाकारांच्या कलेचे दर्शन घडले.
‘ऑपरेशन सिंदूर’ देखाव्याने प्रकटली राष्ट्रभक्ती
ऑपरेशन सिंदूरसारखे राष्ट्रीय भारतीय सैन्यांचे शौर्य व एकात्मतेचे प्रतिक असलेले देखावेही या मिरवणुकीत पाहायला मिळाले. प्रत्येक देखाव्याबरोबरच ग्रामस्थांनी आकर्षक वेशभूषा तर काही देखाव्यांना पुरक अशा व्यक्तीरेखांच्या वेशभूषाही साकारल्या. केंद्रीय उर्जाराज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे आडपई गावातील असल्याने त्यांनीही आपल्या कुटुंबातील गणपतीसह मिरवणुकीत भाग घेतला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार अॅङ नरेंद्र सावईकर व अन्य मान्यवरांनी मिरवणुकीला उपस्थिती लावली.
मोबाईल कॅमेऱ्यांसह चित्रकारांच्या कुंचल्यांनीही क्षण टिपले
मिरवणुकीतील उत्साहाचे हे क्षण आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्याचा मोह तर कुणालाच आवरता आला नाही. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या हातातील मोबाईल कॅमेरे ही क्षणचित्रे टिपत होते. शिवाय विविध माध्यमांसाठी रिल्स व डॉक्युमेंट्री बनविणारे कलाकारांचे कॅमेरेही मिरवणुकीत प्रसंग चित्रीत करण्यासाठी खास उपस्थित होते. विशेष म्हणजे काही व्यावसायिक चित्रकारांचे एक पथकही कॅन्हवास लावून हे अविस्मरणीय उत्साहाचे क्षण कुंचल्यातून रेखाण्यासाठी सज्ज झाले होते.
आडपई गावात पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला वेगळे महत्त्व असून याची प्रचिती मिरवणुकीच्या उत्साहपूर्ण वातावरणातून दिसून आली. या गावात घरोघरी गणपती पुजले जात नाहीत. सर्व कुटुंबियांकडून एकत्रित गणपती पुजण्याची प्रथा आहे. त्यात खुमणेभाटकर, कुर्डीकर, म्हार्दोळकर, वस्त, सकले मुळे, मधले मुळे, वयले मुळे, बोरकर, सोसेभाटकर, लोटलीकर, खांडेकर, महालक्ष्मी, पोकळे, श्री शिवंबा निवास या व अन्य कुटुंबाचा समावेश आहे. यंदा या सर्व कुटुंबीयांनी चित्ररथ देखावे तयार कऊन दिंडी मिरवणुकीसह मोठ्या थाटात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गोव्याच्या विविध भागातील भाविकांची गर्दी लोटली होती.