आदिवासी समाजाचा झोपडीत गणेशोत्सव
कोणत्याही सुविधा नसलेल्या नंदगड येथील आदिवासी समाजाचा सरकारी जागेतील झोपडीत उत्सव
वार्ताहर/नंदगड
स्वत:च आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, राहायला घरही नाही. परंतु इतरांच्या बरोबरीने गणेशोत्सव साजरा करण्याची तळमळ राहिल्याने रस्त्याच्या बाजूला एका सरकारी खुल्या जागेत झोपडी घालून भक्तीभावाने गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने नंदगड येथील एका आदिवासी समाजाने साजरी केली आहे. त्यांच्या या उत्सवाची परिसरात चर्चा आहे. गेल्या कित्येक पिढ्या कातकेरी आदिवासी समाज नंदगड गावच्या बाजूला जंगलाच्या शेजारी एका सरकारी जागेत वास्तव्यास आहे. नंदगडपासून डोंगरावरील मिरॅकल होली क्रॉसवर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला सरकारी जागेत त्यांची आठ कुटुंबे गवताच्या झोपड्या घालून राहतात. या समाजातील या कुटुंबांना स्वत:ची जागा नसल्याने सरकारी जागेत ते राहतात. त्यांच्या या झोपड्यांची कोणत्याही कार्यालयात नोंद नाही. त्यामुळे त्यांना विजेची सोय नाही. शिवाय रॉकेल मिळत नसल्याने दिवसा सूर्याच्या प्रकाशात तर रात्री मेणबत्तीच्या आधारावर दिवस काढावे लागतात.
जोराचा वारा आणि पाऊस आला तर मेणबत्ती विजते. त्यावेळी मात्र अंधारातच रात्र काढावी लागते. पिण्यासाठी पाणी जवळच्या दुर्गानगर भागातील एखाद्या नळाचे आणावे लागते. कपडे धुण्यासाठी गावापासून काही अंतरावर दूर असलेल्या जलाशयाला जावे लागते. आठही कुटुंबे कुणाच्या शेतात, कधी ऊसात तर कधी भात कापणीसाठी कामाला जातात. मिळेल त्या मजुरीतून दिवस काढावे लागतात. मुलांचे शिक्षण नसल्याने त्यांचेही भविष्य अंधारातच आहे. या समाजातील व्यक्तीकडे स्वत:चे आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, त्यामुळे कोणतीही शासकीय सुविधा मिळत नाही. रोजचे काम मिळवण्यासाठी अनेकांना विनंती करावी लागते. प्रामाणिकपणे मोलमजुरी केल्याने पोटापाण्याचा प्रश्न काही अंशी सुटतो. परंतु भविष्य मात्र अद्यापही अंधारातच आहे. नंदगड गावातील अनेकांच्या घरात गणपती उत्सव पाहतो. आम्ही गणपती उत्सव साजरा करावा म्हणून गवताची झोपडी घालून तेथे गणपती उत्सव गेल्या चार वर्षापासून या समाजातील लोक साजरा करत आहोत. यावर्षीही त्यांनी गणपती पूजला आहे. येथील पाच दिवसाच्या गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यात आले.
सरकारने आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
समाजातील इतर लोकांप्रमाणे आम्हीही माणसंच आहोत. इतराप्रमाणेच सुखसोयी आम्हाला मिळणे गरजेचे आहे. सरकारने आम्हाला रेशनकार्ड, आधार कार्ड, अन्न, वस्त्र, घर बांधण्यासाठी जागा यासह विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रतिक्रिया या समाजातील युवक रमेश निकम यांनी व्यक्त केली आहे.
- रमेश निकम
