गांधीजींच्या पुतळ्याची लंडनमध्ये विटंबना
भारतीय दुतावासाने नोंदवला निषेध
वृत्तसंस्था/ लंडन
लंडनमधील टॅविस्टॉक स्क्वेअरमधील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्यावर आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. ‘गांधी, मोदी आणि हिंदूंना ‘दहशतवादी’ असे संबोधण्यात आले आहे. यासंबंधीचा मजकूर लिहिण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला आहे. तसेच काही भागाची तोडफोडही करण्यात आली. भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. ही केवळ पुतळ्याची तोडफोड नाही तर महात्मा गांधींच्या अहिंसा आणि शांततेच्या मूल्यांवर हल्ला असल्याचे भारतीय दुतावासाने म्हटले आहे. दुतावासाने या घटनेची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ब्रिटिश अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिक पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
महात्मा गांधींचा हा पुतळा 1968 मध्ये बांधण्यात आला होता. तो प्रसिद्ध पोलिश-भारतीय शिल्पकार फ्रेडा ब्रिलियंट यांनी तयार केला होता. हा कांस्य पुतळा युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या शेजारी असलेल्या टॅविस्टॉक स्क्वेअर या बागेत स्थापित आहे. गांधीजी 1888 ते 1891 पर्यंत सदर युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये कायद्याचे विद्यार्थी होते. लंडनमधील त्यांच्या काळातील आठवणी आणि त्यांच्या जागतिक वारशाला आदरांजली वाहण्यासाठी हा पुतळा तयार करण्यात आला होता. दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी येथे गांधी जयंतीनिमित्त, पुतळ्याजवळ समारंभ आयोजित केले जातात. याप्रसंगी फुले अर्पण करणे, भजन गाणे आणि स्मृती मेळावे यांचा समावेश आहे. मात्र, यंदाच्या जयंतीपूर्वीच पुतळ्याची तोडफोड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. गांधींच्या पुतळ्याला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगभरात त्यांच्या पुतळ्यांची तोडफोड करण्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत.