काँग्रेस अधिवेशनानिमित्त वर्षभर ‘गांधी भारत’ कार्यक्रम
शतक महोत्सव समितीच्या बैठकीत निर्णय : 26-27 डिसेंबरला बेळगावात होणार सभा : 120 ठिकाणी स्मृतीस्तंभ निर्माण करणार
बेंगळूर : बेळगावमध्ये 1924 मध्ये महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अधिवेशनाच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर ‘गांधी भारत’ नावाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये 26 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची सभा आणि 27 डिसेंबर रोजी जाहीर सभा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी रात्री बेंगळूरमध्ये काँग्रेस अधिवेशन शतक महोत्सव समितीची बैठक झाली. यावेळी महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 साली बेळगावमध्ये झालेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने यंदा वर्षभर गांधी भारत नावाने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 26 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची सभा आणि 27 डिसेंबर रोजी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. म्हैसूर दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील प्रमुख मार्गांवर 32 कि. मी. लांब व प्रमुख 30 चौकांमध्ये विद्युत रोषणाई केली जाणार आहे. बेळगावमधील काँग्रेस रोडवरील वीरसौधचा विकास केला जाणार आहे. या ठिकाणी ग्रंथालय व गांधीजींच्या प्रतिमेचे अनावरण केले जाईल. बेळगावमध्ये 2.1 कि. मी. लांबीच्या काँग्रेस रोडवर शतक महोत्सवाचे स्मारक म्हणून तात्पुरते विरुपाक्ष गोपूर, रेल्वेमार्गाच्या संरक्षण भिंतीलगत प्रतिकात्मक शिल्पकला निर्माण केल्या जातील.
हुदलीतील स्मारक,छायाचित्र गॅलरीचा विकास
कणबर्गी येथे गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकस्थळी मूर्ती प्रतिष्ठापना, म्युझियमचे उद्घाटन केले जाईल. हुदली येथे गांधी स्मारक व छायाचित्र गॅलरीचा यानिमित्ताने विकास केला जाईल. गांधीजींनी भेट दिलेल्या राज्यातील 120 ठिकाणी स्मृतीस्तंभ निर्माण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. रिचर्ड अॅटनबरो यांनी तयार केलेल्या ‘गांधी’ चित्रपटाचे कन्नडमध्ये निर्माण करण्यात येणार आहे. सुवर्णसौधमध्ये काँग्रेस अधिवेशन, स्वातंत्र चळवळ प्रतिबिंबित करणारे छायाचित्र गॅलरी निर्माण केले जाइंल. 26 डिसेंबर रोजी महनीय व्यक्तींसाठी तर 27 रोजी नागरीकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. शतक महोत्सवाच्या निमित्ताने टपाल तिकिटाचेही अनावरण केले करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये गांधीजींच्या विचारधारेचा प्रभाव पाडण्यासाठी विविध स्पर्धा आयोजिल्या जातील. गांधीजींचे विचार व संविधानाची प्रस्तावना छपाई करून सर्व शाळांना वितरित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. काँग्रेस अधिवेशन शतक महोत्सव रुपरेषा, आयोजनासंबंधी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अधिवेशन शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष मंत्री एच. के. पाटील, मानद अध्यक्ष डॉ. एम. वीरप्पा मोईली, बी. एल. शंकर, प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर. व्ही. देशपांडे, कन्नड व सांस्कृतिक खात्याचे मंत्री शिवराज तंगडगी, महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा, वार्ता व जनसंपर्क खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर, बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष वुडे पी. कृष्ण आदी उपस्थित होते.