कडोलीत गणरायाचा आगमन सोहळा
गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-घरगुती सजावटी पूर्ण
वार्ताहर /कडोली
शनिवार दि. 7 रोजी पासून सुरू होत असलेल्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती सजावटी पूर्ण झाल्या असून येथील अयोध्यानगर आणि सावकार गल्लीतील सार्वजनिक गणरायांचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. कडोली येथे जवळपास 11 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. उद्यापासून गणेश चतुर्थीला प्रारंभ होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी तयारी पूर्ण केली आहे. येथील अयोध्यानगर, पेठ गल्ली सार्वजनिक गणपतीचे बुधवारी जल्लोषात आणि उत्साहात आगमन सोहळा पार पडला.
आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत श्री कलमेश्वर भजनी मंडळ, हुबेहूब दिसणारा कृत्रिम हत्ती या मिरवणुकीत समाविष्ट केल्याने हा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. शिवाय यावेळी घोड्यावर विराजमान झालेले छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या पेहरावातील बालके सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच झुंज झांजपथक आणि डॉल्बीच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली. सदर आगमन सोहळा पाहण्यासाठी नागरिक आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. तसेच येथील सावकार गल्लीतील सार्वजनिक गणपतीचा आगमन सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. तर उर्वरित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती शनिवारी मंडपात विराजमान होणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे.