बाळेकुंद्री खुर्द परिसरात गणरायांचे जल्लोषात स्वागत
वार्ताहर/बाळेकुंद्री
बेळगाव पूर्वभागातील बाळेकुंद्री खुर्द, मोदगा, होनिहाळ, पंत बाळेपुंद्री, मारीहाळ, सुळेभावी, हुदली आदी गावांत शनिवारी फटाक्यांच्या आतषबाजीत, डॉल्बी, बेंजो व इतर वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया... अशा जयघोषात विघ्नहर्त्या गणरायाचे पारंपरिक पध्दतीने व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाने सकाळपासूनच उघडीप दिल्याने बाळेकुंद्री खुर्द येथील सुतार बांधवांच्या घरी व मारुती देवालयातून श्री मूर्ती नेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर मोदगा, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मारीहाळ, सुळेभावी, हुदली गावात सकाळच्या सत्रात घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती. दुपारी दोनपर्यंत श्री ची मूर्ती नेऊन घरात प्रतिष्ठापना करण्यात आल्या. दुपारी दोननंतर घरगुती गणेशाचे आगमन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशमूर्ती आणण्याची लगबग सुरू झाली. पूर्व भागातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो व आदी वाहनांना सजवून आणण्यात येत होत्या. याचवेळी पावसाच्या हलक्या व कांही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्यास प्रांरभ झाल्याने मूर्तीना प्लास्टिकचे आवरण झाकून नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बॅन्ड, बेंन्झो, भजनीमेळा, झांजपथक, ढोल ताशे व डॉल्बीच्या दणदणाटात सार्वजनिक गणेशमूर्ती आणण्यात आल्या.