सरवडेत तब्बल चौदा तासांच्या मिरवणूकीने गणरायाला निरोप! विविध वाद्यांचा गजर, भजन व डॉल्बीचा समावेश
मध्यरात्रीपर्यंत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
सरवडे प्रतिनिधी
डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई, डॉल्बीचा दणदणाट आणि त्यावर थिरकणारी तरुणाई तसेच विविध वाद्यांचा गजरासह महिलांची गौरी गीते व भजन अशा अमाप उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सरवडेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल चौदा तासांच्या मिरवणूकीने बाप्पाला निरोप देण्यात आला. सर्व प्रथम दुपारी बारा वाजता किसनराव मोरे हायस्कूलच्या गणेशमूर्तीचे तर मध्यरात्री पाणवठा गल्लीच्या गणेश तरुण मंडळाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीतील डॉल्बी बारा वाजता बंद करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्ये व खेळांच्या समावेशाने मिरवणूक सुरू राहिली.
यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यामुळे गणेश भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरणात होते. अनेक मंडळांनी देखावे व महाप्रसादाचे आयोजन केले होते. गणेश विसर्जन मिरवणुकीत तर हा उत्साह द्विगुणित झाला होता. गावातील अनेक मंडळांनी मिरवणुकीत डाॅल्बीचा समावेश केला होता. विठ्ठलाई तालीम मंडळाने लेझीम तर ओम गणेश,अभिनव,जय वीर हनुमान आदी मंडळांनी भजन गात महिलांच्या सहभागाने विसर्जन मिरवणूक काढली. सिध्दीविनायक मंडळाने डाॅल्बीसह महिलांचा झिम्मा फुगडी गाण्याचा समावेश केला.किसनराव मोरे हायस्कूलच्या मिरवणुकीत बालकलाकरांनी सादर केलेले नृत्याविष्कार व पारंपारिक गाण्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विसर्जन मिरवणुकीत सकाळपासून मध्य रात्रीपर्यंत संत गोरोबा कुंभार तरुण मंडळ, शिवप्रेमी, भारतप्रेमी, शाहुप्रेमी, अष्टविनायक,शिव गर्जना, हनुमान तालीम, सिध्दीविनायक,ओम गणेश, नवनाथ शक्ती, विठ्ठलाई तालीम, जनसेवा दत्त तालीम,हिंदु खाटीक, श्री राम तरुण मंडळ , विठ्ठलाई तालीम, शिवाजी तालीम, व्यापारी मंडळ सहभागी होते.सर्व मुर्तींचे विसर्जन दूधगंगा नदीत करण्यात आले. पावसाने उघडीप दिल्याने मिरवणूकीचा आनंद सर्वांना घेता आला.