For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! : स्कीट शूटिंग

06:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी     स्कीट शूटिंग
Advertisement

‘स्कीट शूटिंग’...मातीचे लक्ष्य टिपण्यात रूची बाळगणाऱ्यांसाठी हा एक आवडता खेळ आणि तो ऑलिम्पिकचा देखील एक महत्त्वाचा घटक...या खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी चपळ हालचाली तसंच हात व नजर यात समन्वय आवश्यक असतो...नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीतील चौथं पदक अगदी हातातोंडाशी येऊन निसटलं ते ‘स्कीट’ प्रकारातच...महेश्वरी चौहान नि अनंतजित सिंह नाऊका यांना स्कीट मिश्र सांघिक स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहावं लागून कांस्यपदक हुकलं...

Advertisement

  • ‘ट्रॅप’प्रमाणं ‘स्कीट’मध्येही नेमबाज ’क्ले’ म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या फक्त 10 सेंटीमीटर व्यासाच्या लक्ष्यांवर बार झाडतात. हे लक्ष्य ताशी 100 किलोमीटर या वेगानं उडत असतं...
  • ऑलिम्पिकमधील ‘स्कीट’मध्ये नेमबाज आठ वेगवेगळ्या ठिकाणांवरून मातीच्या लक्ष्यांवर गोळीबार करतात. प्रत्येकाला ‘स्टेशन’ म्हणून ओळखलं जातं. ‘क्लेस’ म्हणजेच लक्ष्यं दोन ठिकाणांवरून उडतात. शूटिंग रेंजच्या डावीकडे एक आणि दुसरं उजव्या बाजूला...
  • ‘स्कीट’ ही स्पर्धात्मक ‘क्ले शूटिंग’च्या तीन प्रमुख शाखांपैकी एक. इतर दोन म्हणजे ‘ट्रॅप शूटिंग’ आणि ‘स्पोर्टिंग क्ले’...या शॉटगन शूटिंग इव्हेंटमध्ये ‘क्ले टार्गेट ट्रॅप’द्वारे लक्ष्यं हवेत फेकली जातात आणि ती आवाक्याबाहेर जाण्यापूर्वी एका विशिष्ट टप्प्यावर बार झाडून फोडावी लागतात...
  • फक्त एका ‘ट्रॅप’मधून फेकल्या गेलेल्या लक्ष्यांना ‘एकेरी’, तर दोन्ही ‘ट्रॅप’मधून टाकलेल्या लक्ष्यांना ‘दुहेरी’ म्हणतात...‘स्कीट शूटिंग’चे तीन भिन्न प्रकार आहेत- ‘नॅशनल स्कीट’, ‘एनएसएसए स्कीट’ आणि ‘ऑलिम्पिक स्कीट’...
  • स्कीट शूटिंगमध्ये 8 मुख्य ‘स्टेशन्स’पैकी 7 अर्धवर्तुळाकार मांडलेली असतात आणि आठवं 1 आणि 7 या ‘स्टेशन्स’च्या मध्यभागी असतं...
  • अर्धवर्तुळाच्या दोन कोपऱ्यात ‘ट्रॅप’ असलेली घरं असतात. ते ‘ट्रॅप’ जमिनीपासून 15 फूट उंचीपर्यंत लक्ष्य फेकतात. यामध्ये ‘हाय हाऊस’ आणि ‘लो हाऊस’ असा प्रकार आढळतो. ‘हाय हाऊस’मधील ‘ट्रॅप’ जमिनीपासून 10 फूट उंचीवरून लक्ष्यं फेकतो, तर ‘लो हाऊस’मधील ‘ट्रॅप’ जमिनीपासून 3 फूट उंचीवरून लक्ष्यं उडवतो...या सर्वांमधून 25 लक्ष्यं सोडली जातात...
  • 1968 च्या खेळांपासून ऑलिम्पिकमध्ये ‘स्कीट शूटिंग’चा समावेश झाला. पॅरिसमध्ये त्यात भर पडली ती मिश्र सांघिक प्रकाराची...‘ऑलिम्पिक स्कीट’वर देखरेख आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाकडून ठेवली जाते आणि या प्रकाराच्या पारंपरिक स्वरुपात व ऑलिम्पिकमधील स्पर्धेत काही सूक्ष्म फरक आढळतात...
  • ऑलिम्पिक ‘स्कीट शूटिंग’साठी वेगवेगळ्या उंचीवरील दोन ‘ट्रॅप’ एका निर्धारित क्रमानं 25 लक्ष्ये सोडतात. त्यापैकी काही एकेरी आणि काही दुहेरी...
  • ऑलिम्पिकमधील स्पर्धा आणखी कठीण होते ती नेमबाजांना त्यांची बंदूक खांद्यावर नसताना लक्ष्यांची मागणी करावी लागत असल्यानं. लक्ष्य सुटल्यानंतर त्यांनी नेम धरण्याकरिता बंदूक उठवायची असते...याशिवाय काही लक्ष्यं तत्काळ सुटतात, तर काहींना 3 सेकंदांपर्यंत विलंब होतो...
  • स्कीट शूटिंगसाठी आवश्यक उपकरणांत कमीत कमी 2 ‘शेल्स’ झाडणारी शॉटगन, 25 ‘शेल्स’ची एक पेटी, एक शेल होल्डर, ‘इअर प्लग्स’ आणि ‘आय प्रोटेक्शन’ यांचा समावेश होतो...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.