खेळ जुनाच ओळख नवी ! रॅपिड चेस
06:00 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बुद्धिबळाचा आता एकच प्रकार राहिलेला नाही. त्यातही अनेक प्रकार पुढं आलेत. त्यापैकी एक म्हणजे ‘रॅपिड’ किंवा जलद बुद्धिबळ...ज्या लोकांना बुद्धिबळाचा ‘क्लासिकल’ प्रकार फारसा भावत नाही त्यांच्यासाठी हा वेगवान पर्याय उपलब्ध झालाय. ‘रॅपिड’चे नियम हे ‘क्लासिकल’सारखेच. परंतु खेळाडूंना त्यांच्या चाली करण्यासाठी 10 ते 60 मिनिटं इतका अवधी असतो...
Advertisement
- ‘रॅपिड’साठीच्या ‘फिडे’च्या नियमांनुसार, प्रत्येक खेळाडूनं त्याच्या चाली 10 मिनिटांपेक्षा जास्त, परंतु 60 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्या पाहिजेत...‘रॅपिड’मध्ये घड्याळाच्या काट्यांशी स्पर्धा करत खेळाडूंना खेळावं लागत असल्यानं हातून जास्त चुका होतात आणि सामना बरोबरीत संपण्याची शक्यता कमी असते...
- येथे ‘ओपनिंग’वर खूप जोर दिला जातो तो वेळ कमी असल्यानं. सामन्याच्या सुऊवातीलाच अडचणीत येण्याची कुणाची इच्छा नसते. कारण विचार करायला आणि परत उसळी घ्यायला वेळ नसतो...शेवटच्या टप्प्यात ‘रॅपिड’चा सामना अत्यंत चुरसपूर्ण होऊन खेळाडू अधिक जोखीम घेणं पसंत करतात...
- भूतकाळात बुद्धिबळातील काही बड्या नावांनी या वेगवान प्रकाराकडे पाहिलंही नसतं. परंतु आजकाल दिग्गज खेळाडू देखील त्याला गांभीर्याने घेतात. परिणामी दर्जा खूप उच्च राहतो आणि वेळेच्या दबावापोटी एखाद दुसरीच चूक घडताना दिसते...
- ‘रॅपिड’मध्ये ‘चेकमेट’च्या व्यतिरिक्त वेळ संपल्यास देखील खेळाडू सामना गमावू शकतात...
- दिग्गज बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन हा सध्या जागतिक ‘रॅपिड’ विजेता असून 2022 व 2023 ची स्पर्धा जिंकली ती त्यानंच...
- ‘रॅपिड’ बुद्धिबळाची संकल्पना (त्याला त्यावेळी ‘अॅक्टिव्ह चेस’ असं म्हटलं जात असे) 1987 मध्ये सेव्हिल, स्पेन येथे झालेल्या ‘फिडे काँग्रेस’च्या बैठकीत अवतरली. पुढील वर्षी झालेल्या जागतिक ‘अॅक्टिव्ह चेस’ स्पर्धेदरम्यान प्रत्येक लढतीत दरेका खेळाडूला 30 मिनिटं इतका वेळ दिला गेला...
- 1993 मध्ये ‘फिडे’पासून विभक्त झाल्यानंतर जगज्जेत्या गॅरी कास्पारोव्हनं ‘अॅक्टिव्ह चेस’ची थोडीशी जलद आवृत्ती विकसित केली, ज्याला ‘रॅपिड चेस’ असं नाव दिलं गेलं. ‘फिडे’ला प्रत्युत्तर म्हणून कास्पारोव्हनं जन्मास घातलेल्या ‘प्रोफेशनल चेस असोसिएशन’नं 1996 मध्ये गाशा गुंडाळण्यापूर्वी ‘रॅपिड चेस’च्या दोन ‘ग्रां प्रि’ मालिकांचं आयोजन केलं...
- पहिला अधिकृत ‘रॅपिड’ सामना 1987 मध्ये लंडन शहरात झाला. त्यात तत्कालीन जगज्जेता गॅरी कास्पारोव्हनं नायजेल शॉर्टचा पराभव केला...
- ‘रॅपिड’च्या अंतर्गत प्रत्येक खेळाडूला 25 मिनिटांची वेळ आणि प्रत्येक चालीमागं 10 सेकंदांचा अतिरिक्त अवधी देण्यात आला होता. ‘फिडे’नं ही वेळ नियंत्रणे आणि सदर नावाचा 2003 मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप’साठी वापर केला. व्लादिमीर क्रॅमनिकला हरवून ती स्पर्धा जिंकली होती भारताच्या विश्वनाथन आनंदनं. तो पहिला जागतिक ‘रॅपिड चेस’ विजेता...
- तसंच 2013 च्या विश्वचषकाच्या दरम्यान ही वेळ नियंत्रणे ‘रॅपिड टायब्रेकर’ टप्प्यांसाठी देखील वापरली गेली...2012 मध्ये ‘फिडे’नं जागतिक ‘रॅपिड व ब्लिट्झ’ बुद्धिबळ स्पर्धेचा नारळ फोडला. सध्याची जागतिक ‘रॅपिड चेस’ स्पर्धेसाठीची निर्धारित वेळ 15 मिनिटं प्रति खेळाडू अशी असून प्रत्येक चालीमागं अवांतर 10 सेकंद दिले जातात...
- ‘क्लासिकल चेस’च्या जागतिक स्पर्धेत देखील जर खेळ पूर्ण झाल्यानंतर बरोबरोची कोंडी फुटली नाही, तर निकाल ‘रॅपिड गेम्स’नी लावला जातो...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement