For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी !‘ब्लिट्झ’ बुद्धिबळ

06:00 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी  ‘ब्लिट्झ’ बुद्धिबळ
Advertisement

ब्लिट्झ बुद्धिबळ...त्याला ‘स्पीड चेस’ म्हणूनही ओळखलं जातं...यात चाली खेळण्यासाठी हाताशी अगदी कमी वेळ असतो. त्यामुळं ‘ब्लिट्झ’ फक्त खेळायलाच नव्हे, तर पाहायलाही मजा येते. खेळ जितका जलद तितकी गुणवत्ता कमी असं मानलं जातं. ते अगदीच चुकीचं म्हणता येणार नसलं, तरी हा वेगवान खेळ खेळताना होणारी लगबग, वेगळ्या प्रकारच्या ‘ओपनिंग’, हातून होणाऱ्या चुका यामुळं हा प्रकार वेगळाच उठून दिसतो...

Advertisement

  • ब्लिट्झ बुद्धिबळची मुळं 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झालेल्या पारंपरिक बुद्धिबळाच्या वेगवान आवृत्तीत सापडतात. मात्र ‘ब्लिट्झ चेस’ हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला तो 60 च्या दशकात...
  • 19 व्या शतकाच्या सुऊवातीस बुद्धिबळ क्लबांनी कमी वेळेच्या स्पर्धा आयोजित करण्यास सुऊवात केली. उदाहरणार्थ, 1904 च्या ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेनंतर हेस्टिंग्ज, इंग्लंडमध्ये झालेल्या ब्लिट्झ स्पर्धेत खेळाडूंना प्रत्येक चालीसाठी 10 सेकंद देण्यात आले होते...
  • 50 चं दशक उगवेपर्यंत हा ‘टाइम कंट्रोल’ प्रत्येक खेळाडूंमागं 5 मिनिटं असा बदलला...1988 मध्ये वॉल्टर ब्राउन यांनी ‘वर्ल्ड ब्लिट्झ चेस असोसिएशन’ व ‘ब्लिट्झ चेस’ या मासिकाची स्थापना केली...
  • ‘फिडे’नुसार, ब्लिट्झ बुद्धिबळातील प्रत्येक खेळाडूला मिळणारी वेळ 10 मिनिटं किंवा त्याहून कमी असते. प्रत्येक चालीमागं अतिरिक्त वेळ देऊन वा न देताही हा प्रकार खेळला जातो. डिजिटल घड्याळांच्या वापरामुळं हे शक्य झालंय...
  • सहसा तीन मिनिटं अन् चालीमागं दोन सेकंदांचा अतिरिक्त वेळ या समीकरणाला पसंती दिली जाते. जागतिक ब्लिट्झ स्पर्धेत हीच पद्धत पाहायला मिळते...अतिरिक्त वेळ जमेस धरला, तरी 60 चालींच्या खेळासाठी प्रति खेळाडू एकूण वेळ 10 मिनिटं केंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक. म्हणजे दर चालीमागं मिळणारा वेळ सरासरी 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी...
  • या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी वेगानं विचारचक्र फिरविणं आणि झपाझप चाली करणं गरजेचं. या प्रकारात बऱ्याचदा आक्रमक पवित्रा घेण्याचं फळ मिळतं. कारण बचाव करण्यापेक्षा हल्ला करणं सोपं असतं...अनेक वर्षांचा सराव असूनही बड्या बड्या खेळाडूंच्या हातून देखील यात चुका घडतात...
  • ‘जागतिक स्पर्धा’ म्हणून ‘फिडे’कडून मान्यता मिळालेली पहिली ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2006 साली इस्रायलमध्ये होऊन त्यात अॅलेक्झांडर ग्रिसचूकनं जेतेपद पटकावलं होतं...पुढील वर्षी ही स्पर्धा (आता त्याला ‘फिडे वर्ल्ड ब्लिट्झ कप’ म्हणून ओळखलं जातं) मॉस्को, रशिया येथे होऊन त्यात युक्रेनियन ग्रँडमास्टर वासिल इव्हान्चूकनं भारताच्या विश्वनाथन आनंदवर मात करत किताब उचलला...
  • 2008 मध्ये क्युबाचा 25 वर्षीय ग्रँडमास्टर लेनियर दुमिंगेझनं, तर 2009 साली प्रथमच नॉर्वेचा अफलातून बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसननं जेतेपद खात्यात जमा केलं. 2010 हे स्पर्धेचं अंतिम वर्ष ठरून त्यात आर्मेनियन ग्रँडमास्टर लेव्हॉन आरोनियननं बाजी मारली...
  • 2011 साली ही स्पर्धा रद्द करावी लागल्यानंतर 2012 मध्ये ‘फिडे’नं ‘जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धे’ची घोषणा करून पहिली स्पर्धा खेळविली गेली ती कझाकस्तानमध्ये. त्यात ब्लिट्झचा विजेता ठरला अॅलेक्झांडर ग्रिसचूक...
  • ही स्पर्धा तेव्हापासून दरवर्षी खेळविली गेली असून सध्याचा जागतिक ब्लिट्झ विजेता आहे तो मॅग्नस कार्लसन. महिला गटात हा मान मिळविलाय रशियाच्या व्हॅलेंटिना गुनिनानं...कार्लसननं इथंही भरपूर झेंडे गाडताना ही स्पर्धा विक्रमी सात वेळा जिंकलीय...
  • तज्ञांच्या मते, कार्लसन नि अमेरिकी खेळाडू हिकारू नाकामुरा यांच्यात क्षणार्धात निर्णय घेण्याची तसंच एका सेकंदात परिस्थितीचा गुंता सोडविण्याची अतुलनीय क्षमता दडलीय...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.