7 वर्षीय मुलाने तयार केला गेम
7 वर्षीय मुलाकडून फार तर शाळेत शिकविण्यात आलेली कविता किंवा कहाण्या तोंडपाठ करण्याची अपेक्षा केली जाते. परंतु अमेरिकेतील एक 7 वर्षांचा मुलगा अत्यंत वेगळा ठरला आहे. ज्या वयात मुले गेम खेळण्यावर भर देतात, अशा वयात या मुलाने एक गेम तयार केला आणि तो विकून कोट्याधीश झाला आहे.
बहुतांश किशोरवयीन मुले स्वत:चा वेळ व्हिडिओ गेम किंवा बाहेर खेळण्यात खर्च करतात, परंतु अमेरिकच्या सिएटल येथे राहणारा 15 वर्षीय एलेक्स बटलर आता कोट्याधीश आहे. एलेक्सने वयाच्या 7व्या वर्षी एक कार्ड गेम ‘टाको वर्सेस बरीटो’ची आयडिया तयार केली होती. तो स्वत:च्या परिवारासोबत कार्ड गेम खेळत मोठा झाला आणि नेहमी नवनवे खेळ आणि आयडिया शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्याचे आईवडिल लेस्ली पियर्सन आणि मार्क बटलर यांच्यासाठी ही नवी बाब नव्हती. कारण एलेक्स बालपणापासून क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स करत राहायचा.
आईवडिलांनी स्वप्न केले पूर्ण
प्रारंभी ही केवळ मजेशीर आयडिया होती, परंतु मुलगा खरोखरच या गेमला बाजारात आणू इच्छितो हे कळल्यावर आईवडिलांनी उत्पादनाचा महाग खर्च जमविण्यासठी एक क्राउडफंडिग प्लॅटफॉर्मची मदत घेतली. या अभियानातून 25 हजार डॉलर्स जमविले, यानंतर परिवाराने हॉट टॅको इंक नावाने कंपनी स्थापन केली. यानंतर परिवाराने उत्पादक निवडला आणि गेमला अमेझॉनवर 20 डॉलर्सच्या किमतीवर विकण्यास सुरुवात केली. एलेक्सला हे स्वप्नपूर्ती झाल्यासारखे होते. गेमची लोकप्रियता अपेक्षेपेक्षा अधिक वाढली आणि 2018 पर्यंत हा अमेझॉनवर नंबर 1 बेस्टसेलर ठरला. त्याचवर्षी परिवाराने सुमारे 9 कोटी रुपयांची कमाई केली.
कोट्यावधींचा मालक
एलेक्सने गेमला अमेरिकन कंपनी प्लेमॉन्स्टरला एका व्यवहाराच्या अंतर्गत विकून टाकले. या व्यवहाराच्या रकमेचा खुलासा झालेला नाही, परंतु हा कोट्यावधी डॉलर्समध्ये झाला असल्याचा अनुमान आहे. हे माझ्यासाठी भावनात्मक नव्हते, मी केवळ अधिकाधिक पैसे कमावू इच्छित होतो असे एलेक्सचे सांगणे आहे.