For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गंभीरची चलाखी, रोहितचा माईंडगेम अन् भारताचा मालिकाविजय

06:58 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
गंभीरची चलाखी  रोहितचा माईंडगेम अन् भारताचा मालिकाविजय
Advertisement

टेस्ट क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी, मायदेशात टीम इंडियाचा सलग 18 वा मालिकाविजय

Advertisement

वृत्तसंस्था/ कानपूर

कानपूरमध्ये टीम इंडियाने असा चमत्कार घडवला जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच पहायला मिळतो. अगदी टी 20 स्टाईलने झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रशिक्षक गौतम गंभीरची चलाखी, कर्णधार रोहित शर्माचा माईंड गेम व गोलंदाजांच्या जादुई कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसात जिंकून बांगलादेशला मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला. विशेष म्हणजे, मायदेशात टीम इंडियाचा हा सलग 18 वा मालिका विजय आहे. भारतीय संघाने मागील 12 वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

Advertisement

बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दबदबा पहायला मिळाला. चौथ्या आणि पाचव्या दिवशी टीम इंडियाने कसोटी टी-20 क्रिकेटसारखा खेळ करत सामना आपल्या नावे केला. सामन्याच्या पहिल्या दिवशी 35 षटके झाली होती. पाऊस आणि खराब प्रकाशामुळे सामना होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती होती तर तिसऱ्या दिवशी पाऊस नव्हता, पण आऊटफिल्ड खराब असल्याने सामना होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत कानपूरचे नाव बदनाम झाले, पण चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी जे घडले ते चमत्कारापेक्षा कमी नव्हते. पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रातच टीम इंडियाने सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप केले.

कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाने 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. यानंतर सामना सुरू होऊ शकला नाही. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही संघ हॉटेलमधून बाहेर पडले नाहीत. पण चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात बांगलादेशला 233 धावांत गुंडाळले. यानंतर रोहित आणि कंपनीने 34.4 षटकात 285 धावा केल्या आणि 9 गडी बाद झाल्यानंतर डाव घोषित केला व टीम इंडियाला अवघ्या 52 धावांची आघाडी मिळाली.

जडेजा, अश्विन, बुमराहचा जलवा

बांगलादेशने पाचव्या दिवसाची सुरुवात 2 बाद 26 धावांवरून केली. संघाने तिसरी विकेट लवकर गमावली. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी शादमान इस्लाम आणि नजमुल शांतो यांनी 55 (84) धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. पण शादमान आणि शांतो यांच्यातील भागीदारी मोडताच बांगलादेशचा संघ गडगडला. मात्र, शेवटी मुशफिकुर रहीम काही वेळ क्रीजवर उभा राहिला पण तोही बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. बांगलादेशसाठी दुसऱ्या डावात शादमानने सर्वाधिक 50 धावा केल्या. रविंद्र जडेजा, अश्विन आणि बुमराह यांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा दुसरा डाव 146 धावांवर आटोपला.

विजयासाठी 95 धावांचे लक्ष्य

भारतासमोर बांगलादेशने विजयासाठी 95 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे विजयी लक्ष्य 17.2 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत टीम इंडियाने विजयाला गवसणी घातली. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. पण, रोहित खराब फटका मारण्याच्या प्रयत्नात 8 धावा काढून बाद झाला. शुभमन गिलही फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. यानंतर जैस्वाल व विराट कोहली जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी साकारत संघाला विजय मिळवून दिला. जैस्वालने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळी साकारली. त्याने 45 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. संघाला विजयासाठी तीन धावांची गरज असताना तो बाद झाला. विराट व पंतने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराट 29 तर पंत 4 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश प.डाव 9 बाद 285 घोषित व दुसरा डाव 146

भारत प.डाव 9 बाद 285 घोषित व दुसरा डाव 17.2 षटकांत 3 बाद 98 (रोहित शर्मा 8, जैस्वाल 51, गिल 6, विराट नाबाद 29, पंत नाबाद 4, मेहदी हसन 2 तर तैजुल इस्लाम 1 बळी).

मायदेशात भारताचा सलग 18 वा मालिकाविजय

कानपूर कसोटी जिंकत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने अनोखा विक्रम नोंदवला आहे. बांगलादेशविरुद्धचा भारताचा हा मायदेशातील 18 वा मालिकाविजय ठरला आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने मायदेशात आतापर्यंत एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. मागील 12 वर्षात मायदेशात एकही मालिका गमावलेली नाही, हे विशेष. मायदेशात सर्वाधिक मालिका जिंकण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे, ज्यांनी घरच्या मैदानावर सलग 10 मालिका जिंकल्या आहेत.

भारतीय संघाने जिंकलेल्या 18 मालिका

  • ऑस्ट्रेलिया वि भारत - भारताचा 4-0 ने विजय (2013)
  • वेस्ट इंडिज वि भारत - भारताचा 2-0 ने विजय (2013)
  • दक्षिण आफ्रिका वि भारत - भारताचा 3-0 ने विजय (2015)
  • न्यूझीलंड वि भारत - भारताचा 3-0 ने विजय (2016)
  • इंग्लंड वि भारत - भारताचा 4-0 ने विजय (2016)
  • बांगलादेश वि भारत - भारताचा 1-0 ने विजय (2017)
  • ऑस्ट्रेलिया वि भारत - भारताचा 2-1 ने विजय (2017)
  • श्रीलंका वि भारत - भारताचा 1-0 ने विजय (2017)
  • अफगाणिस्तान वि भारत - भारताचा 1-0 ने विजय (2018)
  • वेस्ट इंडिज वि भारत - भारताचा 2-0 ने विजय (2018)
  • दक्षिण आफ्रिका वि भारत - भारताचा 3-0 ने विजय (2019)
  • बांगलादेश वि भारत - भारताचा 2-0 ने विजय (2019)
  • इंग्लंड वि भारत - भारताचा 3-1 ने विजय (2021)
  • न्यूझीलंड वि भारत - भारताचा 1-0 ने विजय (2021)
  • श्रीलंका वि भारत - भारताचा 2-0 ने विजय (2022)
  • ऑस्ट्रेलिया वि भारत - भारताचा 2-0 ने विजय (2023)
  • इंग्लंड वि भारत - भारताचा 4-1 ने विजय (2024)
  • भारत वि बांग्लादेश - भारताचा 2-0 ने विजय (2024).
Advertisement
Tags :

.