भारतीय नौदलाचे शौर्य
बुल्गारियाच्या अध्यक्षांकडून कौतुक, सागरी चाच्यांपासून वाचविले जहाज : चालक दलाचे सर्व 17 सदस्य सुखरुप
वृत्तसंस्था/ सोफिया
भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढती प्रतिमा आणि हिंदी महासागरातील सामर्थ्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. भारतीय नौदलाने सागरी चाच्यांच्या कब्जातून बुल्गारियन जहाजाला मुक्त करविले आहे. भारतीय नौदलाच्या या शौर्यासाठी बुल्गारियाचे अध्यक्ष रुमेन रादेव यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून आभार मानले आहेत. अपहृत बुल्गारियन जहाज ‘रुएन’ आणि 7 बुल्गारियन नागरिकांसमवेत चालक दलाला वाचविण्यासाठी भारतीय नौदलाने दाखविलेल्या शौर्याबद्दल आम्ही आभार मानतो असे बुल्गारियाच्या अध्यक्षी कार्यालयाने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
कुख्यात सोमालियन सागरी चाच्यांनी डिसेंबर महिन्यात बुल्गारियन रुएन जहाजावर कब्जा केला होता. जहाजाच्या चालक दलाच्या सदस्यांमये बुल्गारियाचे 7, म्यानमारचे 9 तर अंगोलियाचा एक नागरिक सामील होता. भारतीय नौदलाने शनिवारी 40 तासांपर्यंत चाललेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत या जहाजाला चाच्यांच्या तावडीतून मुक्त करविले होते. भारतीय नौदलाने भारताच्या सागरकिनाऱ्यापासून 2800 किलोमीटर अंतरावर ही मोहीम राबविली आहे.
मागील 40 तासांदरम्यान भारतीय युद्धनौका आयएनएस कोलकाताने ठोस कारवाईच्या माध्यमातून सर्व 35 सागरी चाच्यांना घेरून आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडले आहे. तसेच चालक दलाच्या 17 सदस्यांना त्यांच्या तावडीतून सोडविल्याचे भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले होते. रुएन जहाजाची मुक्तता केवळ आमच्यासाठी नव्हे तर पूर्ण जागतिक सागरी समुदायासाठी एक मोठे यश असल्याचे उद्गार जहाजाचे बुल्गारियन मालक नवीबुलगर यांनी काढले आहेत.
जहाजावरील सर्व लोक सुरक्षित असल्याचा आणि लवकरच ते घरी परतणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. भारत हिंदी महासागरात सागरी चाचे आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढत राहणार आहे. मुक्तसंचाराचे रक्षण आम्ही करत राहू असे पंतप्रधान मोदींनी बुल्गारियन अध्यक्षांच्या टिप्पणीदाखल म्हटले आहे.
मित्र याचकरता असतात!
दुसरीकडे बुल्गारियाच्या विदेश मंत्री मारिया गॅब्रियल यांनी बचाव मोहिमेनंतर तेथील भारतीय राजदूत संजय राणा यांची भेट घेत भारतीय नौदलाचे आभार मानले आहेत. भारतीय नौदलामुळेच जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बुल्गारियाच्या अध्यक्षांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी ‘मित्र याचकरता असतात’ असे नमूद पेले आहे.
अमेरिकेकडून कौतुकोद्गार
अमेरिकेने भारतीय नौदलाच्या कार्याचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सागरी चाच्यांच्या विरोधात भारतीय नौदलाने केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे ऑस्टिन यांनी म्हटले आहे.