For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंडखोरीत कमावले ते वाटाघाटीत गमावले?

06:07 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंडखोरीत कमावले ते वाटाघाटीत गमावले
Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बंडखोरी करून जे मिळाले ते मोठेच यश होते. पक्षाच्या प्रमुखांना मोडीत काढण्याचे धाडस सोपे नसते. मात्र स्वत:चा पक्ष चालवताना आपले अस्तित्व आणि आब राखून ठेवताना कोणते दिव्य करावे लागते याची पहिली चुणूक त्यांना भाजपशी तिकिटाच्या वाटाघाटी करताना दिसली. जे त्यांनी बंडखोरीने कमावले ते वाटाघाटीत गमावले असे वातावरण निर्माण झाले आहे. तर 20 पैकी 8 जागा घराणेशाहीच्या प्रतिनिधींना देऊन भाजपने 40 टक्के घराणेशाहीला चाल दिली आहे.

Advertisement

शिंदे सेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उध्दव ठाकरे यांची भाजपशी मातोश्रीच्या बंद खोलीत फिफ्टी फिफ्टी तडजोड कशी झाली होती ते मान्य करून त्या गूढ कथानकाला बळ देऊ केले. अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाने स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याबाबत आणि शरद पवारांचा फोटो वापरू नये म्हणून सुनावले. घड्याळ चिन्ह न वापरण्याचा सल्ला ते धाडसाने मान्य करतात का समजेलच. अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन घराणेशाहीवर टीका करून पाच दिवसही झाले नाहीत, तोपर्यंत भाजपने 40 टक्के तिकिटे विशिष्ट घराण्यांच्या उमेदवारांना देऊन काँग्रेससह तिन्ही विरोधकांवर असलेला आक्षेप स्वत:च मोडीत काढला. पंकजा मुंडे (बीड), पीयूष गोयल (मुंबई), रक्षा खडसे (रावेत), सुजय विखे पाटील (नगर), अनुप धोत्रे (अकोला), भारती पवार (दिंडोरी), हीना गावित (नंदुरबार), संजय काका पाटील (सांगली) हे महाराष्ट्राच्या पहिल्या यादीतील 40 टक्के उमेदवार घराणेशाहीच्या प्रतिनिधींमध्ये मोडतात. इतक्या मोठ्या संख्येने इतर राज्यातून उमेदवारी दिली असेल का? पण, भाजपला ‘भाई-भतिजा’ वादाला बहुतेक महाराष्ट्रात अपवाद करावे लागेल. अद्याप त्यांच्या पक्षातील उदयनराजे भोसले, पूनम महाजन इत्यादींच्या उमेदवारीचे काय करायचे याचाही निर्णय झालेला नाही. मित्रपक्षाच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील तर भाजपला तिथला प्रचार गेल्यावेळीच्या सभेला विसरून नव्याने करावा लागेल. शिवाय अजित पवारांच्या विकास पद्धतीचे गोडवे गावे लागतील. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीव डॉ. श्रीकांत यांना डावलणे सोपे की भाजपायींची समजूत काढणे सोपे हे ठरवण्याची जबाबदारी कदाचित फडणवीस यांनाच पार पाडायला लावली जाऊ शकते. हे सर्व प्रश्न सोडवताना पवार, ठाकरे, आंबेडकर आणि काँग्रेस अशा आघाडीला मुंबईत धक्का देण्यासाठी मनसेचे चौथे इंजिन जोडून घेण्याचा आणि त्यांचा उमेदवार कमळ चिन्हावर लढवण्यास तयार करण्याचे दिव्यही पार पाडायचे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सध्या भाजपबरोबर वाटाघाटीत आपल्या पक्षाच्या वाट्याला चांगला हिस्सा मिळवायचा आहे. पण 48 पैकी 20 लोकसभेच्या जागांचे उमेदवार भाजपने एकतर्फी जाहीर करून टाकले आहेत. उर्वरित 28 मध्ये भाजपला आवश्यकच वाटणारे मतदारसंघ सोडून इतर कुठले सोडायचे यावर चर्चा होणार आहे. त्यातही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्यापैकी काही खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता खूप अधिक आहे. काहींना तिकीट दिले जाऊ नये तर काहींनी कमळ चिन्हावर लढावे हा भाजपचा दबाव आहे. अजित पवार यांच्यासाठी जागा सोडतानाही त्यांना कुठले हवे आहेत यापेक्षा भाजपला त्यांना कुठल्या कुठल्या मैदानावर लढवायचे आहे याला महत्त्व आहे. त्यामुळेच बारामतीतून पवार विरुद्ध पवार लढत झालीच पाहिजे ही जशी अलिखित अट मान्य करूनच पुढची वाटचाल सुरू आहे त्याचप्रमाणे इतर मतदारसंघांचा निर्णय होणार आहे. आपण ज्या पक्षात दुय्यम पदे सांभाळत होतो तिथे आपल्या पक्षाच्या प्रमुखाकडे हट्ट करून आणि यादी सोपवून ते मतदार संघ सोडवून घेण्यासाठी पक्षांतर्गत दबावाचे राजकारण करणे किती सोपे होते आणि भाजपच्या धोरणी राजकारणाला थेट चर्चेत भिडताना कशी दमछाक होते, दडपण येते याचा अनुभव हे नेते घेत असतील. विजय शिवतारे प्रकरण जितके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताळणे अवघड चालले आहे तेवढेच त्यांचे बोल सहन करणे ‘ताड की फाड’ अजित दादांना देखील जिकिरीचे ठरत असेल. पण, आता जबाबदारी म्हणजे चोहोबाजूने बुक्क्यांचा मार असतो आणि तो तोंड बंद करून निमूट सोसावा लागतो, पाठ टणक करावी लागते आणि पोटातच सगळं जिरवून विसरून जावं लागतं याची त्यांना पहिल्यांदाच जाणीव होत असावी.

Advertisement

अजून राज ठाकरे यांची परीक्षा बाकी आहे. 2014 च्या निवडणुकीपूर्वी गुजरातची प्रगती पाहून त्यांनी मोदींचा जोरदार प्रचार केला. पण त्याकाळात जे पाहिलं ते फसवं होतं याची जाणीव त्यांना 2019 ची निवडणूक येता येता झाली. मग ‘लाव रे तो व्हीडिओ’ चा काळ आला. पण ज्यांच्यासाठी तो प्रचार चालवला त्या काँग्रेसचाच टिकाव लागला नाही. मित्र अशोक चव्हाण यांनाच फटका बसला. त्यानंतरच्या पाच वर्षात बरंच काही घडलं. पण त्याचा मनसेला लाभ झाला नाही. मनसेच्या सततच्या अपयशाचे कारण खरोखरच अनाकलनीय आहे. ही एक मोठीच शोकांतिका आहे की, प्रादेशिक विचार मांडणाऱ्या एका नव्या दमाच्या राजकीय पक्षाचे धोरण नेमक्यावेळी बदलते आणि मतदारांसमोर नेमके मराठी विचार मांडणारे इतर पक्ष कमकुवत होऊनही तेच त्या विषयाचे प्रतिनिधी ठरतात. मनसेने या दबावातून हिंदुत्वाचा विचार स्वीकारला. मात्र शिवसेना आणि भाजप अशा दोन हिंदुत्वाच्या तोलामोलात मनसेचे हिंदुत्व पुन्हा चर्चेत येता येता चौकटी बाहेर निसटले. आता ते मुंबईत कसा शह देणार ते पहायचे.

शरद पवार एकीकडे रोज एक सहकारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जुन्या लोकांना चाल देत आहेत त्यातून निलेश लंके ते मोहिते पाटील सर्वांच्या मतदार संघात खळबळ माजली आहे. त्यांच्या जागा वाटपाचा ते पत्ता लागू देत नाहीत पण, दौरे जोरदार करत आहेत. ही लढाई आता नव्या वळणावर आली आहे. फुटीमुळे विरोधक गलितगात्र होतील ही अपेक्षा फोल ठरली असून ते आपली शक्ती वाढवत चालले आहेत. परिणामी राज्याचे राजकारण रंजक ठरत आहेच. पण, शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या भवितव्यात वाटचालीचे चित्रही याच काळात निश्चित होणार असल्याने देशाचे लक्ष त्यांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असणार आहे. त्यांना ज्या पद्धतीचे यश मिळणार असे विविध सर्व्हे सांगत आहेत तसे मिळाले तर तो महायुतीसाठी मोठा धक्का ठरू शकतो ज्याचे परिणाम विधान सभेलाही जाणवतील. आचारसंहिता शनिवारी लागू झाली तर इथले राजकारण गती घेईल.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.