2026 मध्ये प्रक्षेपित होणार गगनयान
इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी दिली माहिती : नासासोबतच्या ‘निसार’ मोहिमेची पुढील वर्षी होणार प्रक्षेपण
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताच्या गगन मोहिमेवर देशासोबतच जगाचीही नजर आहे. इस्रोच्या मिशन गगनयानाच्या प्रक्षेपणाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी देशाच्या महत्त्वाच्या मोहिमेविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. इस्रोच्या काही महत्त्वपूर्ण आगामी मिशन्सच्या नव्या तारखांचा खुलासा त्यांनी केला आहे. मानवयुक्त मिशन गगनयान 2026 मध्ये प्रक्षेपित होणार असल्याचे त्यांनी सांगितले ओ. तर चांद्रयान-4 हे 2028 पर्यंत प्रक्षेपित केले जाणार आहे. याचबरोबर निर्धारित कालावधीपेक्षा विलंब होत असलेले भारत-अमेरिका संयुक्त निसार मिशन अखेर पुढील वर्षी प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या अधिक स्वदेशीकरणाची गरज आहे. भारत पुढील एक दशकात जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत स्वत:चे योगदान वर्तमान 2 टक्क्यांवरून वाढवत कमीतकमी 10 टक्के करण्याचे लक्ष्य बाळगून वाटचाल करत असल्याचे सोमनाथ यांनी म्हटले आहे.
2028 मध्ये चांद्रयान-5चे प्रक्षेपण
जपानची अंतराळ संस्था जाक्सासोबत संयुक्त चंद्र-लँडिंग मिशन ज्याला मूळ स्वरुपात लूपेक्स किंवा लूनर पोलन एक्सप्लोरेशन नाव देण्यात आले होते, तेच चांद्रयान-5 मिशन असणार आहे. लूपेक्स मिशनला पूर्वी 2025 च्या कालमर्यादेत प्रक्षेपित केले जाणार होते, परंतु आता याला चांद्रयान-5 च्या स्वरुपात उल्लेखिण्यात आल्याने 2028 नंतरच याचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.
2028 पर्यंत स्पेस सेंटरचे युनिट
सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रासाठी चौथ्या मोहिमेला मंजुरी दिली आहे. 2028 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाच्या (बीएएस) पहिल्या युनिटच्या निर्मितीला देखील सरकारने हिरवा झेंडा दाखविला होता. सरकारने 2035 पर्यंत एक भारतीय अंतराळ स्थानक आणि 2040 पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीय उतरविण्याची योजना आखली आहे. या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी केंद्र सरकारने बीएएस-1 च्या पहिल्या मॉड्यूलच्या विकासाला मंजुरी दिली आहे.
2040 मध्ये चंद्रावर मानवी मोहीम
लूपेक्स एक अत्यंत अवजड मिशन असणार आहे. यात लँडर भारताकडून प्रदान करण्यात येईल. तर रोव्हर जपानमधून येणार आहे. चांद्रयान-3 वर रोव्हरचे वजन केवळ 27 किलोग्रॅम होते. परंतु लूपेक्स मिशन 350 किलोग्रॅमचा रोव्हर स्वत:सोबत नेणार आहे. हे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी तसेच आव्हानात्मक मिशन आहे, जे आम्हाला चंद्रावर मानव उतरविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे नेणार आहे. भारताने 2040 पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम राबविण्याची योजना आखली असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले आहे.