बेळगाव-मोपा खास रस्त्यासाठी गडकरींचे वेधले लक्ष
किरण ठाकुर यांनी केली अनेक विषयांवर चर्चा : चोर्ला, अनमोड रस्त्यांचे कामही तातडीने पूर्ण करा
नवी दिल्ली : तरुण भारत समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नवी दिल्ली-अकबर रोडवरील निवासस्थानी भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. बेळगाव ते मोपा चार पदरी रस्ता तयार करावा, तसेच चोर्ला रस्ता दुरुस्ती व अनमोड रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे केली. सुमारे पाऊण तासभर झालेल्या या चर्चेदरम्यान नितीन गडकरी यांनी मनमोकळेपणाने बातचीत केली. बेळगावातून गोव्याला मोठ्या प्रमाणात भाजीपाला जातो. मोपा विमानतळाला जाण्यासाठी स्वतंत्र असा चार पदरी रस्ता झाला तर बेळगावातील भाजीपाला, धान्य पुरवठा मोठ्या प्रमाणात मोपा विमानतळापर्यंत पोहोचून त्यानंतर तो देशभरामध्ये वेळेत वितरित होईल. यासाठी बेळगाव ते मोपा विमानतळ असा स्वतंत्र चार पदरी रस्ता तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी किरण ठाकुर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. मोपा विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असेही गडकरी म्हणाले.
अनमोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा
बेळगाव-चोर्ला मार्ग सध्या खड्डेमय झाल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय येत असून त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशीही विनंती मंत्री गडकरी यांना केली. अनमोड रस्त्याच्या संथगतीने चाललेल्या कामाबाबतही यावेळी चर्चा झाली. हा रस्ता वनखात्याच्या जंगलभागातून जात असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही. बेळगाव-खानापूरपर्यंत रस्त्याचे काम झाले असले तरी खानापूरनंतर गोवा हद्दीपर्यंतचे अनमोड रस्त्याचे काम संथगतीने चालू आहे. यामध्ये असलेले काही अडथळेही दूर करावेत, अशी विनंती त्यांना केली. त्यावर नितीन गडकरी यांनी आपण यामध्ये तातडीने लक्ष घालू, असे आश्वासन दिले. या चर्चेवेळी राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, अमरावती येथील दै. हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे उपस्थित होते.
नितीन गडकरी यांच्या जीवनावरील चित्रपट भावला
नितीन गडकरी यांच्या जीवनावरील ‘गडकरी’ हा सिनेमा आपल्याला खूप भावला असल्याचे किरण ठाकुर यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थीदशेपासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा जीवनपट या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. आणीबाणीच्या काळातील कांही प्रसंग त्यामध्ये उत्कृष्टरितीने मांडण्यात आले आहेत. गडकरींच्या संघर्षमय जीवनातील पूर्ण आलेख या चित्रपटात साकारण्यात आला आहे. त्याबद्दलच्या प्रसंगांबाबत किरण ठाकुर यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून चित्रपट आपल्याला खूप भावल्याचे सांगितले. सध्या महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.