भावी शिक्षकांचीच सीईटीला दांडी
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक भरतीसाठी घेतल्या जाणाऱया सीईटी परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी जनरल पेपरला 2261 तर इंग्रजी पेपरला 535 परीक्षार्थी अनुपस्थित होते. परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पीएसआय परीक्षेदरम्यान झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते.
बेळगाव शहर व परिसरात 25 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्रांवर येणाऱया परीक्षार्थीची तपासणी केली जात होती. परीक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी सरदार्स हायस्कूल येथील परीक्षा केंदाला भेट दिली. परीक्षेदरम्यान परीक्षार्थीची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना दिल्या.
सकाळच्या सत्रात जनरल विषयाचा पेपर पार पडला. एकूण 5967 परीक्षार्थींनी अर्ज केला होता. त्यापैकी 3706 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात इंग्रजी विषयाचा पेपर झाला. 1650 परीक्षार्थींनी अर्ज केला होता. त्यापैकी 1115 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. गैरहजर परीक्षार्थींची संख्या अधिक असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. आज रविवार दि. 22 रोजीही उर्वरित विषयांची परीक्षा होणार आहे.