बलूच दहशतवाद्यांना भारताकडून फंडिग
पाकिस्तान बलुचिस्तानला 1971 चा बांगलादेश होऊ देणार नाही
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारत आणि त्याची गुप्तचर यंत्रणा रॉकडून फंडिंग मिळत असल्याचा दावा पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अन्वर उल काकड यांनी केला आहे. आमची लढाई बलुचिस्तानातील सशस्त्र संघटनांच्या विरोधात आहे, बलुचांच्या विरोधात नाही. निदर्शने करणारया लोकांना हे समजून घ्यावे लागेल की, त्यांचे कुटुंबीय देशाच्या विरोधात काम करत होते. विदेशातून मदत मिळवून करण्यात आलेले हे एक बंड असल्याचे काकड यांनी म्हटले आहे.
बलुचिस्तानचे 98 टक्के लोक आजही पाकिस्तानसोबत आहेत. हे काही 1971 नाही. बलुचिस्तान हे बांगलादेश नाही, ते वेगळे होणार नसल्याचा दावा काकड यांनी केला आहे. 23 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने एक मोहीम राबवून 4 जणांची हत्या केली होती. यात बलाच मोला बख्श नावाचा युवक देखील मारला गेला होता. बख्शच्या कुटुंबीयांनी याला बनावट चकमक ठरविले आहे. या विरोधात बलुचिस्तानच्या लोकांनी निदर्शने सुरू केली आहेत.
बलुचिस्तानपासून इस्लामाबादपर्यंत सुमारे 1600 किलोमीटरची पदयात्रा या लोकांनी काढली आहे. संबंधित सुरक्षा यंत्रणेकडून शस्त्रास्त्रs काढून घेतली जावीत आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या बलुच लोकांना मुक्त केले जावे अशी मागणी निदर्शकांनी केली आहे. पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान काकड हे देखील मूळचे बलुचिस्तानचे आहेत, यामुळे याप्रकरणी त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
जे लोक या निदर्शनांना समर्थन करत आहेत, त्यांनी देखील बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमध्ये सामील व्हावे. आतापर्यंत सुमारे 90 हजार निर्दोष व्यक्तींचा मृत्यू झाला असून यासाठी केवळ 9 जणांनाच शिक्षा झाली आहे. पाकिस्तानची न्यायप्रणाली कमकुवत असून ती दहशतवाद्यांना शिक्षा मिळवून देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मानवाधिकार समर्थकांनी आरोपींच्या विरोधात कधीच आवाज उठविला नसल्याचा दावा काकड यांनी केला.