हिरेबागेवाडीतील शेल्टर-एबीसी सेंटरसाठी 23 लाखांचा निधी
मनपाच्या बांधकाम स्थायी समितीत विविध विषयांना मंजुरी : शहरातील विविध प्रभागांमध्ये नवीन हायमास्ट तसेच युजी केबल दुरुस्तीसाठीही निधी मंजूर
बेळगाव : हिरेबागेवाडी येथे भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर आणि एबीसी सेंटर उभारण्यासाठी अखेर 23 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्याचा ठराव सोमवार दि. 10 रोजी पार पडलेल्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत संमत करण्यात आला. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या हद्दीत इमारत बांधण्यासाठी ग्राम पंचायतींकडून बांधकाम परवाना दिला जात आहे. अशा ग्राम पंचायतींबाबत जिल्हा पंचायतीकडे तक्रार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सोमवारी स्थायी समिती सभागृहात बांधकाम स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवी राघोचे होत्या. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली. त्यानुसार बैठकीत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे. कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
यापूर्वी श्रीनगर येथील गोशाळेत एबीसी सेंटर सुरू होते. मात्र, स्थानिकांनी त्याला विरोध केल्याने काही दिवसांपासून कुत्र्यांची निर्बिजीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली आहे. हिरेबागेवाडी गावात सर्व्हे नं. 431 मध्ये महानगरपालिकेची जागा आहे. त्या ठिकाणी कुत्र्यांसाठी शेल्टर आणि एबीसी सेंटर उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने काम सुरू झाले नव्हते. यापूर्वी झालेल्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत हा विषय चर्चेला आला होता. त्यावेळी तातडीने तात्पुरते शेल्टर उभारण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली होती. सोमवारच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीतही प्रामुख्याने या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार तातडीने शेल्टर व एबीसी शेल्टर उभारण्यात यावे, यासाठी 23 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्याचा ठराव करण्यात आला.
जिल्हा पंचायतीकडे करणार तक्रार
शास्त्राrनगर येथील प्रभाग क्र. 13 मधील नवीन रस्त्यासाठी पथदीप व युजी केबल घालण्यासाठी साडेतीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शहरातील विविध प्रभागांमध्ये नवीन हायमास्ट आणि युजी केबल दुरुस्तीसाठी निधीही मंजूर करण्यात आला. मनपाकडून एनए लेआऊट नसलेल्या भूखंडात घरे बांधण्यास परवाना देणे बंद केले आहे. त्यामुळे काही मिळकतधारक शहरालगतच्या ग्राम पंचायतींकडून बांधकाम परवाना घेत आहेत. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या ग्राम पंचायतींकडून महापालिका हद्दीत बांधकाम परवाना दिला जात आहे, अशा ग्राम पंचायतींची चौकशी करून कारवाईबाबत जिल्हा पंचायतीकडे तक्रार करण्याचा ठरावही केला. तसेच इमारतींना पूर्णत्व प्रमाणपत्र दिले नसतानाही हेस्कॉमकडून त्या इमारतींना वीजमीटर दिले जात आहे. याचीही चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. बैठकीला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सदस्य राजू भातकांडे, श्रेयस नाकाडी, सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली, संदीप जिरग्याळ, दीपाली टोपगी, ज्योती कडोलकर, शाहीदखान पठाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.