संपूर्ण तयारी... यशस्वी चोरी... मात्र पोलीस ठरले भारी!
रेल्वे कर्मचारी, प्राध्यापक, बँक कर्मचारीही अडकले : किमान 12 ते 14 जणांचा या प्रकरणात सहभाग
बेळगाव : मनगोळी (जि. विजापूर) येथील कॅनरा बँकेत झालेल्या चोरी प्रकरणी आणखी चौघा जणांना विजापूर पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी विजापूरचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बँक चोरी प्रकरणाच्या तपासाचा पहिला भाग जाहीर केला होता. तपासाचा दुसरा भागही अत्यंत उत्कंठा वाढविणारा आहे. कर्नाटकातील आजवरच्या सर्वात मोठ्या चोरी प्रकरणात रेल्वे कर्मचारी, प्राध्यापक, बँक कर्मचारीही अडकले आहेत. कॅनरा बँक मनगोळी शाखेचा माजी व्यवस्थापक विजयकुमार मिरियाल (वय 41, रा. हुबळी), त्याचा मित्र व या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार चंद्रशेखर नेरेल्ला (वय 38, रा. हुबळी), सुनील मोका (वय 40, रा. हुबळी) या त्रिकुटाला अटक करून साडेदहा किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. तपासाच्या पुढील भागात आणखी चौघा जणांना अटक झाली आहे. किमान 12 ते 14 जणांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आले आहे.
23 मे 2025 च्या सायंकाळी 7 ते 25 मे 2025 च्या सकाळी 11.30 या वेळेत मनगोळी येथील कॅनरा बँकेच्या लॉकरमधून 53 कोटी 26 लाख रुपये किमतीचे 58 किलो 97 ग्रॅम दागिने चोरण्यात आले होते. तब्बल एक महिन्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या चोरी प्रकरणाचा तपास कसा झाला, यावरच एक चित्रपट काढता येतो. तब्बल 50 हून अधिक अधिकारी व पोलिसांचा समावेश असलेल्या आठ पथकांनी महिनाभर यासाठी काम केले आहे. विजापूरचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामनगौडा हट्टी, शंकर मारिहाळ आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस उपअधीक्षक, पाच मंडल पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक, तीस हवालदार व पोलीस व तांत्रिक विभागाचे तज्ञ कामाला लागले होते. राज्यातील सर्वात मोठी चोरी असल्यामुळे तपासासाठी वरिष्ठांकडून सातत्याने पाठपुरावा सुरूच होता.
उपलब्ध माहितीनुसार या संपूर्ण चोरी प्रकरणाचे केंद्रबिंदू हुबळी येथे आहे. चोऱ्या, घरफोड्या, दरोडे प्रकरणात गुंतणाऱ्या तरुणांपैकी अनेक जण व्यसनाधिनतेमुळे गुन्हेगारीकडे वळले आहेत. अशा अनेक प्रकरणांच्या तपासावरून अधोरेखित झाले आहे. पहिल्या टप्प्यात अटक करण्यात आलेल्या चंद्रशेखर नरेल्ला याला जडलेला कॅसिनोचा नाद कॅनरा बँक व्यवस्थापक विजयकुमार मिरियाल याचा कर्जबाजारीपणा या प्रकरणाला कारणीभूत आहे. चंद्रशेखरने तर कॅसिनोसाठी श्रीलंकाही गाठले होते. रिअल इस्टेट व्यावसायिक, शिक्षण संस्था चालक, कंत्राटदार असे अनेक भूमिका निभावणारा चंद्रशेखर हाही एकेकाळी राष्ट्रीयकृत बँकेत काम करीत होता. त्याच्यावरही कारवाई झाली. बँकेतून बाहेर पडून तो रिअल इस्टेट व्यावसायिक बनला. विजयकुमारने हुबळीत घर बांधले होते. त्यासाठी तो कर्जबाजारी झाला होता. त्याला कर्जातून मुक्त करण्यासाठी चंद्रशेखरने दिलेला सल्ला मनगोळी येथील मोठ्या चोरीला कारणीभूत ठरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
या प्रकरणात अडकलेले सर्व गुन्हेगार हुबळीचे आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण तयारी करून या टोळीने बँकेतील सोने लुटले आहे. बेंगळूर, म्हैसूर, बेळगावहून तांत्रिक तज्ञांना बोलावून त्यांची तपासासाठी मदत घेण्यात आली आहे. कॉल डिटेल्ससाठी पोलिसांचा सर्व्हर कमी पडला म्हणून अडीच लाख रुपये खर्चून नवी यंत्रणाच खरेदी करण्यात आली. मनगोळी पोलीस स्थानकासाठी नवी इमारत बांधकाम सुरू आहे, त्याची वास्तुशांतीही अजून झालेली नाही. याच इमारतीत 50 जणांची टीम बँक चोरीच्या तपासात गुंतली आहे. सुरुवातीला गुन्हेगार आतीलच असणार असा संशय होता. तरी तामिळनाडू, केरळ, मुंबई आदी ठिकाणी पथके पाठविण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातही बनावट चाव्यांचा वापर करून सोसायटी व बँक लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विजापूर पोलिसांनी बेळगाव पोलिसांकडूनही माहिती घेतली आहे. चंद्रशेखर नेरेल्ला व कॅनरा बँकेचा वरिष्ठ व्यवस्थापाक विजयकुमार मिरियाल या दोघा जणांनी तर चोरीसाठी भरपूर तयारी केली होती. यासाठी आजवरच्या बँक दरोडे व चोरी प्रकरणावर आधारित चित्रपट पाहिले. वेबसिरीज पाहून मनाची तयारी केली. संपूर्ण चोरीची योजना व तयारी हुबळीत करण्यात आली आहे.
9 मे पर्यंत विजयकुमार मिरियाल हा कॅनरा बँकेच्या मनगोळी शाखेचा व्यवस्थापक होता. लॉकरच्या चाव्या आपल्या सोबत आणून हुबळीत त्याने बनावट चाव्या बनवून घेतल्या. पोलिसांना चकविण्यासाठी दोघा रेल्वे कर्मचाऱ्यांचाही वापर करण्यात आला. रेल्वे विभागाच्या ट्रकमधून दोन दुचाकी मनगोळीत आणण्यात आल्या. जेणेकरून त्या दुचाकींचे क्रमांक सीसीटीव्हीत नोंद होऊ नयेत, याची काळजी घेण्यात आली. एखाद्या चोरी किंवा दरोडे प्रकरणानंतर पोलीस कार, ऑटोरिक्षा व इतर वाहने अडवितात. ट्रक अडविण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून सोन्याचे दागिने हुबळीला नेताना ट्रकमधून नेण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. एखादा गुन्हा करण्यापूर्वी गुन्हेगार सर्व तयारी करूनच मैदानात उतरतो. चंद्रशेखर व विजयकुमार यांनीही आपल्या व आपल्या टोळीतील इतर सहकाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली होती. जर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचलेच तर कायदेशीर मदत कशी मिळवायची, याचीही व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. यासाठी कायदा सल्लागारांना मोठी रक्कमही देण्यात आली होती. आपल्यापर्यंत पोलीस पोहोचणार नाहीत याची गुन्हेगारांना खात्री होती. जर पोहोचलेच तर कायदेशीर मदत कशी मिळवायची? याची तयारी त्यांनी आधीच करून ठेवली होती.
आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. आणखी सहा ते सात जण फरारी झाले आहेत. यापैकी बहुतेक जण केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी आहेत. आता सर्वात मोठ्या चोरी प्रकरणात अडकल्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांवरही गदा येणार आहे. पहिल्या भागात 10 कोटी 75 लाख रुपये किमतीचे साडेदहा किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. आणखी मोठ्या प्रमाणात सोने जप्त करायचे आहे. पोलिसांना चकविण्यासाठी या टोळीतील अनेक गुन्हेगारांनी पळ काढला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तपासाच्या दुसऱ्या भागात आणखी धक्कादायक माहिती उघडकीस येणार आहे.
बँक ग्राहकांमध्ये मात्र संभ्रम
या प्रकरणाने बँक ग्राहकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. आपले दागिने सुरक्षित रहावेत म्हणून लॉकर घेऊन लॉकरमध्ये ठेवले जातात. घरी ठेवलेल्या दागिन्यांवर चोर, दरोडेखोर कधीही डल्ला मारू शकतात. त्यामुळे लॉकरमध्ये ठेवलेले दागिने सुरक्षित असतात, अशी आजवरची भावना होती. मनगोळी येथील प्रकरणाने या भावनेला तडे गेले आहेत. अलीकडच्या अनेक चोऱ्या व दरोडे प्रकरणात बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे बँक ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. लॉकरही सुरक्षित नाहीत, दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. यामुळे दागिने किंवा आपली रोकड कशी आणि कोठे सुरक्षित राहणार? हा प्रश्न उद्भवला आहे.
हुबळी हेच केंद्रबिंदू
चोरी प्रकरणाच्या तपासाची धुरा सांभाळणारे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी हे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. बेळगावच्या जिल्हा पोलीसप्रमुख पदावर सेवा बजावताना महामार्गावर हत्तरगी टोलनाक्यावर साडेपाच किलो सोन्याची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीस अधिकारीच गुंतले होते. तरीही लक्ष्मण निंबरगी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला होता. आता कर्नाटकातील आजवरच्या सर्वात मोठ्या चोरी प्रकरणाचा तपास ते करीत आहेत. तब्बल 50 हून अधिक अधिकारी, पोलीस व तांत्रिक विभागातील तज्ञ यासाठी काम करीत आहेत. या संपूर्ण चोरी प्रकरणाचा केंद्रबिंदू हुबळी हेच आहे. बनावट चाव्या तयार करून देण्यांवरही एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
