अंगभर टॅटू, नंतर पश्चात्ताप
सांप्रतच्या काळात टॅटू काढून घेण्याची प्रथा चांगलीच बोकाळली आहे. अंगावर शक्य तितक्या स्थानी टॅटू काढून घेतल्यावरच कित्येकांना चैन पडते. अनेकदा हे टॅटू विद्रूप दिसतात. मूळच्या नितळ त्वचेचा सत्यनाश करतात. तरीही ही क्रेझ वाढतच आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची एक प्रसिद्ध मॉडेल अँबर ल्युके हिने काढून घेतलेले टॅटू लोकप्रिय झाले आहेत. तथापि, या महिलेची व्यथा वेगळीच आहे.
या महिलेने केवळ हौस म्हणून अंगभर टॅटू काढून घेतले आहेत. अगदी चेहराही मोकळा सोडलेला नाही. हे टॅटू काढून घेण्यासाठी तिने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. आता हा टॅटूचा अतिरेक तिला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे. 10 वर्षांपूर्वी तिने आपल्या सर्वांगावर तसेच चेहऱ्यावरही टॅटू काढून घेतले. त्यावेळी तिला हा प्रकार अतिशय रोमांचक वाटला. पण गेल्या 10 वर्षांमध्ये ती आपला चेहरा स्वच्छपणे पाहू शकलेली नाही. ब्रिस्बेनमध्ये राहणारी ही महिला सध्या 30 वर्षांची आहे. आता तिला आपला मूळचा चेहरा पाहण्याची आणि मूळची त्वचा पुन्हा प्राप्त करण्याची आस लागली आहे. परंतु, एकदा काढलेले टॅटू पुसणे आणि त्वचा पुन्हा पूर्वीसारखी करणे हे वाटते तितके सोपे नसते. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करावी लागते. तसेच टॅटू काढून घेण्यासाठी जितका खर्च येतो, तितकाच किंवा त्याहीपेक्षा अधिक खर्च ते पुसण्यासाठी येतो. पुसूनही मूळची त्वचा जशीच्या तशी प्राप्त करता येणे शक्य नसते, असे काही तज्ञांचे मत आहे. टॅटू कशा प्रकारे काढून घेतलेले आहेत, त्यावर ते किती प्रमाणात पुसले जाऊ शकतात, हे अवलंबून असते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. या महिलेला आता आपल्या टॅटूप्रेमाचा पश्चात्ताप होत आहे, असे दिसून येते. तिने आता आपली त्वचा आणि मुखमंडल पुन्हा पूर्वीसारखे करण्याचा निर्धार केला असून ती कामाला लागली आहे.