For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐतिहासिक ध्येयाची पूर्ती

06:21 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऐतिहासिक ध्येयाची पूर्ती
Advertisement

प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी अयोध्येत साकारलेल्या भव्य राममंदिरावर ध्वर्मध्वजाचे आरोहण करण्यात आल्याने एका ऐतिहासिक ध्येयाची पूर्ती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणे, हा विशेष योगायोग आहे. प्रभू रामचंद्र हे भारतातील समस्त हिंदू जनतेचे भगवान आहेत. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत संपूर्ण भारतवर्षात आणि भारतवर्षाबाहेरही त्यांची कीर्ती पसरलेली आहे. अशा सर्वव्यापक, सर्वसाक्षी आणि सर्वशक्तीमान देवतेचे जन्मस्थान हे त्यांना मानणाऱ्या समाजाच्या हाती असू नये, हा एक दैवदुर्विलास होता. बाबर नावाच्या एका परकीय आक्रमकाने रामजन्मभूमीच्या स्थानीच आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळाची उभारणी करुन हिंदूधर्मियांच्या भावनांचा घोर अपमान केला होता. या घटनेला अजून 3 वर्षांनी 500 वर्षे पूर्ण होतील. साधारणत: पाच शतकांच्या या काळात हिंदू समाजाने हे पवित्र स्थान परत मिळविण्यासाठी अनेकदा संघर्ष केला. अन्य धर्माच्या प्रार्थनास्थळाची उभारणी या स्थानी झाल्यानंतरही हिंदू समाज ही रामजन्मभूमीच आहे, ही वस्तुस्थिती विसरलेला नव्हता. परकीय आक्रमकांनी हिंदू समाजाला या स्थानी येण्यावर बंदी घातल्यानंतरही प्रत्येक वर्षी लक्षावधीच्या संख्येने हा समाज या स्थानी श्रद्धेने आणि आस्थेने येतच होता. परिसरात जाण्यास अनुमती नव्हती, तरी बाहेरुनच आपल्या रामलल्लाचे दर्शन घेऊन परतत होता. केवळ हिंदूच नव्हे, तर पराक्रमी शीख योद्ध्यांनीही या स्थानाच्या मुक्तीसाठी आपले रक्त सांडले आहे. पण, परकीय आणि परधर्मिय आक्रमकांची शक्ती अधिक असल्याने आणि हिंदू समाज विस्कळीत आणि विमनस्क स्थितीत असल्याने या प्रयत्नांना यश आले नव्हते. तरीही हे स्थान कधी ना कधी परकीयांच्या दास्यातून मुक्त होईल आणि आपल्याला या स्थानी सन्मानाने प्रवेश मिळून आपल्या दैवताची पूजाअर्चा करण्याची संधी प्राप्त होईल, हे या समाजाचे स्वप्न होते. या स्वप्नाची पूर्ती करणे हे ध्येय हिंदू समाजाने बाळगले होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची हाताळणी होत होती, तेव्हा या सर्व घटना ऐतिहासिक सत्याच्या स्वरुपात न्यायदेवतेसमोर सादर करण्यात आल्या होत्या. या स्थानावर ‘रामलल्ला विराजमान’ या देवतेचा आणि तिच्या माध्यमातून हिंदूचा अधिकार आहे. हे स्थान त्यांना परत देण्यात आले पाहिजे, हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध करण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या पीठाने या स्थानावर ‘रामलल्ला विराजमान’ यांचेच मंदिर व्हावयास हवे, असा नि:संदिग्ध आणि एकमुखी निर्णय 2019 मध्ये दिला. त्यानंतर त्वरित भव्य राममंदिराच्या निर्माणकार्याला प्रारंभ करण्यात आला आणि जवळपास सहा वर्षांच्या कालावधीनंतर हे निर्माणकार्य पूर्ण करण्यात आले आहे. या मंदिरावर आता धर्मध्वजाचे आरोहरण करण्यात आले आहे. कोणत्याही मंदिराचे निर्माणकार्य पूर्णत्वास गेल्यानंतरच त्यावर ध्वजा आरोहित केली जाते. अशा प्रकारे या भव्य राममंदिराचे निर्माणकार्य मंगळवारी अधिकृतरित्या पूर्णत्वास पोहचले आहे. हा दिवस धर्मावर निष्ठा आणि श्रद्धा असणाऱ्या कोणत्याही हिंदू मानवासाठी विशेष अभिमानाचा आहे. कारण त्याच्या धर्मभावनांवर झालेला एक क्रूर आघात त्याने 500 वर्षांच्या अथक परिश्रमांनी आणि पराक्रमाने निष्फळ केला आहे. परकीय आणि परधर्मिय आक्रमकांनी हिसकावून घेतलेले आपले एक महत्त्वाचे धर्मस्थान हिंदूंनी परत मिळवणे ही घटना हिंदूंच्या इतिहासात एकमेव म्हणावी लागेल. सर्वसाधारणपणे हिंदू मानसिकता ही परधर्मियांचे अन्याय आणि अत्याचार सहन करण्याची आहे. सोशिकता हा या समाजाचा गुणधर्म आहे. कित्येकदा ही सोशिकता दुर्बलतेत रुपांतरित होत असूनही हिंदू समाज ती सोडत नाही. यामुळेच अनेक परधर्मियांनी भारतावर साधारणत: 1,200 वर्षे सुखनैव राज्य केले आणि येथील हिंदू जनतेचे शोषणही मोठ्या प्रमाणात केले. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतरही हिंदू समाजाच्या आचरणात किंवा मानसिकतेत विशेष परिवर्तन झाले नाही. स्वतंत्र भारताच्या प्रारंभीच्या राज्यकर्त्यांनीही हिंदूंच्या भावनांचा विशेष आदर केल्याचे दिसत नाही. ‘धर्मनिरपेक्षता’ नामक संकल्पनेच्या आधाराने अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणे आणि हिंदूंच्या धर्मभावना पुरोगामित्वाच्या नावाखाली पायदळी तुडविणे हे होतच राहिले. (परित्यक्ता मुस्लीम महिलांना त्यांच्या पतींनी पोटगी दिली पाहिजे, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वाचा निर्णय केवळ मुस्लीमांच्या भावना दुखावू नयेत, म्हणून नाकारण्यात येण्याची कृती त्याच काळात घडली होती. तथापि, हिंदूंची राममंदिरांची मागणी मात्र, सातत्याने नाकारली जात होती.) नंतर, साधारणत: 1985 च्या आसपास जेव्हा रामजन्मभूमी आंदोलनाला प्रारंभ झाला, तेव्हा जातीपातींच्या भिंती ओलांडून संपूर्ण हिंदू समाजाचे समर्थन या आंदोलनाला मिळाले. या व्यापक समर्थनामुळे भारताच्या राजकारणाची दिशाच पालटली आणि राममंदिर समर्थकांची सत्ता या देशावर आल्यानंतर आज हे भव्य राममंदिर पूर्णत्वास आले आहे. संपूर्ण हिंदू समाजाने कोणतेही भेदाभेद न मानता राममंदिरासाठी एकत्रितपणे केलेला संघर्ष पाच शतकांची पूर्ती करत असताना, रामजन्मभूमीस्थानी हे भव्य राममंदिर मंगळवारी पूर्णार्थाने साकारणे ही घटना म्हणूनच हिंदू समाजाच्या इतिहासात अत्याधिक महत्त्वाची आहे. राममंदिरावर धर्मध्वजेचे आरोहण हा एक धार्मिक औपचारिकतेचा भाग असला, तरी हिंदू समाजाचा आत्मविश्वास संवर्धित करण्यासाठी तो कारणीभूत ठरणार आहे. कोणत्याही समाजाला एकत्र येण्यासाठी एका संमिलन बिंदूची आवश्यकता असते. हिंदू समाजासाठी हे राममंदिर हा तो बिंदू ठरला असल्याचे दिसून येते. आता यापुढे भविष्यकाळातही जेव्हा या समाजाला आव्हानात्मक परिस्थितीशी दोन हात करावे लागण्याचा काळ येईल, तेव्हा अयोध्येतील या राममंदिरावर गर्वाने फडकणारा हा ‘धर्मध्वज’ या समाजाला प्रेरणा आणि उत्साह देईल, हे निश्चित.

Advertisement

Advertisement
Tags :

.