दिवंगत पत्नीची इच्छा केली पूर्ण
सागरकिनारी हिंडण्याची होती इच्छा
पतीपत्नीचे नाते या जगात सर्वात खास असते, कारण हे नातं रक्ताचं नसलं तरीही यात प्रेम आणि विश्वासाचा ओलावा असतो. दोघांनीही साताजन्माच्या साथीची शपथ घेतलेली असते, परंतु एकत्र मृत्यूला कवटाळण्याची इच्छा पूर्ण होईलच असे नाही. याचमुळे जेव्हा एक साथीदार सोडून जातो, तेव्हा दुसऱ्यासाठी जगणे अत्यंत अवघड होत असते. असेच काहीसे या पतीसोबत घडले असावे, परंतु त्याने स्वत:च्या पत्नीच्या निधनानंतर जे केले ते त्याला दिलासा देणारे होते आणि त्याच्या पत्नीच्या आत्म्यालाही शांती लाभली असावी.
इन्स्टाग्रामवर अलिकडेच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सकारात्मक आहे, तसेच भावुक करणारा देखील आहे. या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती दिसून येत असून तो समुद्रकिनाऱ्यावर एक व्हिलचेअर फिरविताना दिसून येतो, तो असे का करत होता हे जाणून घेतल्यावर तुमचे डोळेही पाणावतील.
अखेरची इच्छा
या व्यक्तीची पत्नी काही काळापूर्वी कालवश झाली आहे. मृत्यूपूर्वी त्याच्या पत्नीने समुद्रकिनारी हिंडायची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. यानंतर मृत पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीने तिच्या व्हिलचेअरसोबत समुद्रकिनारा गाठला आणि तेथे व्हिलचेअर फिरवू लागला. आता हा व्यक्ती नेहमी असे करत असते. माझ्या या कृत्यामुळे माझ्या पत्नीचा आत्मा सुखावेल असे त्याचे सांगणे आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
या व्हिडिओला आतापर्यंत 11 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर अनेक जणांनी कॉमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या आईची आठवण झाली, जिला मी समुद्रकिनारा दाखविला होता असे एका इसमाने नमूद केले आहे.