नागरी सुविधांची त्वरित पूर्तता करा
जांबोटी-राजवाडा देसाई गल्लीतील नागरिकांचे ग्रा. पं.ला निवेदन
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-राजवाडा येथील देसाई गल्लीमध्ये रस्ता व पिण्याच्या पाण्याची समस्या आदी नागरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सदर समस्या त्वरित दूर करावी, अशा मागणीचे निवेदन नुकतेच गल्लीतील नागरिकांच्यावतीने जांबोटी ग्राम पंचायतला देण्यात आले आहे. जांबोटी-राजवाडा या गावाला ऐतिहासिक महत्त्व असून या गावाने आजही शेकडो वर्षांपासून संस्थानिकांचा वसा जपला आहे. मात्र या संस्थानचे मूळ निवासी देसाई गल्लीतील नागरिकांना जांबोटी ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे रस्ते, पाणी, गटारी आदी नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गल्लीतील रस्त्याअभावी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर बनली असून बारमाही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
सध्या गल्लीतील नागरिक चौखाबा मंदिरासमोरील कूपनलिकेचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करीत असले तरी संपूर्ण गावासाठी ही एकमेव कूपनलिका असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.तसेच गल्लीतील रस्त्यांना गटारींची समस्या उपलब्ध नसल्यामुळे पावसाचे पाणी व सांडपाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्यामुळे गैरसोय होत असल्याचे निवेदन ग्रा.पं. उपाध्यक्ष सुनील देसाई यांना देण्यात आले. दिवाळीपूर्वी सर्व नागरी समस्यांची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी राजकुमार देसाई, व्यंकटेश देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते. उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी निवेदनाचा स्वीकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.