पाकिस्तानात पोहोचला फरार झाकीर नाईक
शाहबाज शरीफ यांनी केले होते आमंत्रित
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारतात वाँटेड असलेला फरार उपदेशक झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला आहे. सोमवारी इस्लामाबाद विमानतळावर झाकीर नाईकचे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. झाकीर नाईक हा पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणानुसार तेथे पोहोचला आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यादरम्यान झाकीर कराची आणि लाहोर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना संबोधित करणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये व्याख्यान दिल्यावर नाईकच्या दौऱ्याचा समारोप होणार आहे.
फरार झाकीरने सोशल मीडियाद्वारे स्वत:च्या पाकिस्तान दौऱ्याची घोषणा केली होती. नाईकचा पहिला कार्यक्रम कराचीत 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बाग-ए-कायदमध्ये तो पाकिस्तानच्या लोकांना संबोधित करणार आहे. यानंतर लाहोर आणि इस्लामाबादमध्ये त्याचे कार्यक्रम आयोजित केले जातील आणि यात झाकीरचा पुत्र देखील सामील होणार आहे.
मुंबईत जन्मलेला झाकीर नाईक हा दीर्घकाळापासून धर्मासंबंधी उपदेश देत राहिला आहे. धर्मांतर करविण्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे. बांगलादेशात 2016 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला होता. बॉम्बस्फोट घडविणारे दहशतवादी झाकीर नाईकच्या भाषणांमध्ये प्रभावित झाले होते. यानंतर भारत सरकारने कारवाई सुरू केल्यावर झाकीरचे अनेक गुन्हे उघडकीस आले. याचदरम्यान झाकीरने भारतातून पळ काढत मलेशियात आश्रय घेतला आहे.
मलेशियात आश्रय
पाकिस्तान सरकारकडूनही आश्रयाची ऑफर मिळाली होती. परंतु भारतातून पळ काढत पाकिस्तानात दाखल झालो असतो तर मला आयएसआयचा एजंट ठरविण्यात आले असते. याचमुळे मी मलेशियात जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा झाकीरने अलिकडेच एका मुलाखतीत केला होता.