For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमध्ये ऊर्जाकेंद्रातून इंधनगळती, नद्या प्रदूषित

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमध्ये ऊर्जाकेंद्रातून इंधनगळती  नद्या प्रदूषित
Advertisement

इंफाळ : मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात एका वीज केंद्रातून मोठ्या प्रमाणात इंधनगळती झाली आहे. इंधनगळती झाल्यावर हे इंधन नजीकच्या भागातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये फैलावल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांगपोकपी जिल्ह्यात लीमाखोंग पॉवर स्टेशन आहे. या पॉवर स्टेशनमधून बुधवारी रात्री कांटो सबल तसेच सेकमाई यासारख्या गावांमधून वाहणाऱ्या नद्यांमध्ये इंधनाची गळती झाली आहे, यामुळे क्षेत्रातील पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. या नद्या खुरखुल, लोइतांग, कामेंग, इरोइसेम्बा आणि नंबुलमधून वाहत इंफाळ नदीत सामावत असतात.  इंधनगळतीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभागांनी यंत्रसामग्री, जनशक्ती आणि तज्ञांच्या संदर्भात सर्व उपलब्ध साधनसाग्रीचा वापर करून पर्यावरणीय आपत्ती रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचा आदेश दिला आहे. प्रभावित नदीपात्रांना वळवून मैदानी भागांच्या दिशेने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंधनगळतीमागे घातपात होता का ही दुर्घटना होती हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मणिपूरचे सार्वजनिक आरोग्य आणि इंजिनियरिंग विभागाचे मंत्री लीशांगथेम सुसींद्रो मैतेई आणि वनमंत्री थोंगम विश्वजीत सिंह यांनी बुधवारी रात्री उशिरा घटनास्थळाचा दौरा केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.