For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पदपथ, सायकल ट्रॅकना फळ विक्रेत्यांचा विळखा

12:22 PM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
पदपथ  सायकल ट्रॅकना फळ विक्रेत्यांचा विळखा
Advertisement

पादचाऱ्यांसाठी आरक्षित पदपथावर विक्रेत्यांनी व्यवसाय थाटल्याने गैरसोय

Advertisement

बेळगाव : एकीकडे बाजारपेठेतील बैठे विक्रेते व फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे उपनगरात पदपथ आणि सायकल ट्रॅकवर फळ विक्रेते आणि ज्यूस विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. पादचाऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या पदपथावर फळ विक्रेत्यांनी व्यवसाय थाटल्याने पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील बाजारपेठ आणि वाहतूक अद्यापही स्मार्ट बनले नाही. गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, काकतीवेस, शनिवार खूट, किर्लोस्कर रोड, रविवार पेठ, कांदा मार्केट आदी ठिकाणी बैठे विक्रेते आणि फेरीवाले मनमानी पद्धतीने बसून व्यवसाय करीत आहेत. खरे तर त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसून, व्यवसाय करणे जरुरीचे आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर अतिक्रमण केले आहे.

Advertisement

बाजारपेठेतील अतिक्रमण महानगरपालिकेकडून हटविले जात आहे. पण या मोहिमेला अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. शहराबाहेरील पदपथावर आणि सायकल ट्रॅकवर सध्या फळ विक्रेते आणि ज्यूस विक्रेत्यांनी अतिक्रमण करून, व्यवसाय थाटले आहेत. कोट्यावधी रुपयांच्या निधीतून शहर परिसरात सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत.

जलवाहिनी घालण्यासाठी चक्क सायकल ट्रॅक फोडले

एलअँडटी कंपनीकडून जलवाहिनी घालण्यासाठी सायकल ट्रॅक फोडले जात आहेत. त्याचबरोबर स्मार्टसिटीने उपलब्ध करून दिलेल्या सायकलीही धूळखात पडल्या आहेत. पादचाऱ्यांसाठी हक्काच्या असलेल्या पदपथावर जिकडे-तिकडे फळ विक्रेते आणि ज्यूस विक्रेत्यांनी व्यवसाय थाटले आहेत. परिणामी पादचाऱ्यांना जोखीम पत्करत रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. पण याकडे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मात्र दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement
Tags :

.