For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Krushi News : फळबाग लागवडीचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान

06:18 PM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur krushi news   फळबाग लागवडीचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान
Advertisement

मनरेगा योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान मिळते

Advertisement

By : सागर पाटील

कळंबा : कोल्हापूर जिह्यातील कळंबा गटात मनरेगा अंतर्गत राबवला जाणारा फळबाग लागवडीचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेमुळे पारंपरिक शेती पद्धतींमध्ये सकारात्मक बदल होत असून, शेतक ऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. करवीर तालुक्यातील 40 गावांमध्ये 15 हेक्टर क्षेत्रावर आंबा, पेरू, ड्रॅगन फ्रूट, केळी, गुलाब आणि मोगरा यासारख्या फळबाग आणि फुलपिकांची लागवड यशस्वीपणे झाली आहे.

Advertisement

आर्थिक सहाय्य आणि अनुदान

मनरेगा योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान मिळते. यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. किमान 0.20 ते 2 हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते. लागवड, ठिबक सिंचन आणि औषध फवारणी यासारखी कामे शेतकऱ्यांनी स्वत: करावीत, अशी अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित फळबाग लागवड अनुदान घटकासाठी अर्ज करावा किंवा ग्रामपंचायत, कृषी विभाग किंवा मनरेगा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सेंद्रिय शेती आणि शाश्वत विकास

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याने शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. ठिबक सिंचन, सेंद्रिय खते आणि जलकुंड यामुळे दुष्काळी भागातही शेती फायदेशीर ठरत आहे. ड्रॅगन फ्रूटसारख्या पिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

युवा शेतकऱ्यांचा सहभाग

युवा शेतकरी फळबाग लागवडीकडे आकर्षित होत असून, कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने लागवड करत आहेत. राज्य शासनाने मनरेगा अंतर्गत या योजनेस विशेष प्रोत्साहन दिले असून, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त, महिला प्रमुख कुटुंबे आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्राधान्य दिले जाते.

शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी पाऊल

पारंपरिक ऊस, भात, ज्वारी यासारख्या पिकांपासून फळबाग आणि फुलशेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांना चार ते पाच वर्षांनंतर चांगले उत्पन्न मिळते. शासनाच्या विविध योजनांतून अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात, असे कृषी सहाय्यक अधिकारी नामदेव गिरीगोसावी यांनी सांगितले. हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतीला शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनवत असून, युवा शेतकऱ्यांचा वाढता सहभाग हे परिवर्तनाचे सकारात्मक लक्षण आहे.

Advertisement
Tags :

.