फल-पुष्प प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
फुलांपासून विविध आकर्षक कलाकृती : बागायतप्रेमींना भुरळ : फुलांपासून सेल्फी पॉईंटची निर्मिती
बेळगाव : बागायत खाते, जिल्हा पंचायत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून 65 व्या फल-पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ झाला. बागायत मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, खात्याचे संचालक बी. एस. रमेश, सचिव डॉ. शामला इक्बाल, सहसंचालक महांतेश मुरगोड आदी उपस्थित होते. बागायत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध फळा-फुलांच्या रोपटांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विशेषत: फुलांपासून विविध आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेऊ लागल्या आहेत. या प्रदर्शनात गुलाब, मोगरा, जास्वंदी, जुई यासह 35 हून अधिक फुलांची रोपटी पहावयास मिळणार आहेत. त्याबरोबर आधुनिक शेतीसाठी सुसज्ज यंत्रणे ठेवण्यात आली आहेत. त्याबरोबर बागायत शेतकऱ्यांना शेतीबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध रोपट्यांबरोबर नैसर्गिक मध, सेंद्रीय खते, कंदमुळे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन पर्यावरणप्रेमींनाही भुरळ घालणार आहे. विशेषत: फुलांपासून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सेल्फी घेण्यासाठी नागरिक दंग होऊ लागले आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत सर्वांना विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहे.